Sangli Samachar

The Janshakti News

पर्यावरणपूरक वस्तूंचा घेऊ ध्यास अन् प्लॅस्टिकला करूयात हद्दपार !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२२ एप्रिल २०२४
जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली होती. पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या दिनामागचा उ्द्देश आहे. एकूण १९३ देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

आपण पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती जगभरात निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे हवामान बदल होय, जो आपण सर्वजण अनुभवत आहोत. दरवर्षी या दिवशी पर्यावरण रक्षणासाठी एक थीम ठरवली जाते आणि यावर्षीची थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक म्हणजेच पृथ्वी विरुद्ध प्लॅस्टिक. 

हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे | ही वसुंधरा प्लॅस्टिकच्या विळख्याने रडते आहे||

पर्यावरणावर दुष्परिणाम करण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत, त्यातील एक म्हणजे प्लॅस्टिक. प्लॅस्टिक हा अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. परंतु, त्याचा वापर गेल्या काही वर्षात भरमसाठ वाढलेला आहे. त्याचा दुष्परिणाम सर्व पर्यावरणावर व मानवाच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे, या वर्षी प्लॅस्टिकचा वापर विशेषत: सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबद्दल आणि प्लॅस्टिकचे उत्पादन 2040 पर्यंत 60% पर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कोणते? ते आपण जाणून घेऊया.


प्लॅस्टिक हे जगातील सर्वोत्तम शोधांपैकी एक आहे. जगातील बहुतांशी सर्वच शोध प्लॅस्टिकमुळेच आपल्या हातात आलेले आहेत. परंतु, त्याचा अतिवापर आणि अयोग्य व्यवस्थापन यामुळेच या विषयावर आता गांभीर्याने दखल घ्यावी लागत आहे. 

जगातील एकूण लोकसंख्या ही 730 कोटी इतकी आहे तर त्याचबरोबर या पृथ्वीवर पडून असलेलं एकूण प्लॅस्टिक याची संख्या पाहता ती 830 कोटी टन इतकी आहे. म्हणजे आज सरासरी प्रत्येक माणसाच्या नावावर अबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्या नावावर बाराशे किलो कचरा आपल्या या पृथ्वीवर पडून आहे, यापैकी काही जमिनीवर तर काही नदी, नाले,समुद्रात.

हे प्लॅस्टिक कुठून आणि कसे आले ?

- भारतात दिवसाला 2.5 कोटी किलो प्लॅस्टिक वेस्ट तयार होतं.

- जगभरातून 20 लाख साध्या प्लॅस्टिक पिशव्या प्रत्येक मिनिटाला कचऱ्यात पडत आहेत. 

- प्रत्येक मिनिटाला दहा लाख प्लॅस्टिक बाटल्या या कचऱ्यात टाकल्या जात आहेत.

तयार झालेला सर्व प्लॅस्टिक कचरा हा इतर कचऱ्यामध्ये मिक्स होऊन कचरा डेपोमध्ये जातो. तो एकतर तिथे जाळला जातो किंवा तसाच पडून राहतो, किंवा ऊन वाऱ्यामुळे उडून जाणारा कचरा हा गटारी, नदी, नाले यामध्ये जाऊन अडकतो.

प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन होत नाही. जमिनीवर पडून राहिलेला प्लॅस्टिक कचरा कालांतराने त्याचे फक्त छोट्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांमध्ये रूपांतर होते. त्यालाच मायक्रो प्लॅस्टिक असं म्हणतात आणि हेच मायक्रो प्लॅस्टिक वेगवेगळ्या माध्यमातून प्राणी पक्षी तसंच माणसाच्याही पोटात जाऊ शकते. जमिनीवर पडून पडून ते जमिनीखाली एका विशिष्ट स्तरावर जाऊन अडकून राहते.

तसंच जे प्लास्टिक गटारी, नदी-नाले, समुद्रात जाऊन पडतं त्यामुळे गटारी तुंबतात नदी समुद्रात प्लास्टिक तरंगताना आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त उरलेला जो कचरा जाळला जातो त्यामध्ये जे प्लास्टिक मिसळलेले असते त्यामुळे टॉक्सिक केमिकल वातावरणात मिसळले जातात. वायु प्रदूषण होते. या सगळ्यामुळे आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. फुफुसाचे आजार, स्किनचे आजार किंवा कॅन्सर सारखे आजार देखील उद्भवतात. आज कॅन्सर चे प्रमाण वाढण्यास प्लास्टिक हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा घटक ठरला आहे. 

काही वेळा घरातील उरलेलं अन्न किंवा उरलेलं पार्सल हे ज्यावेळी आपण आहे असं प्लास्टिकच्या पिशवी सहित कचराकुंडीत टाकतो किंवा उघड्यावर टाकतो तेव्हा त्यातील अन्नाच्या वासाने अनेक प्राणी ते अन्न खाण्यासाठी तिथे येतात. ते प्राणी ते अन्न त्या प्लास्टिक पिशवी सहितच खातात. तेव्हा त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन ते प्राणी दगावतात. याचे अनेक उदाहरणे आपण स्वतः पाहिलेली आहेत आणि वाचलेलीही आहेत. 

संपूर्ण जगाचा विचार करता आपली एकूण पाच महासागर आहेत पैकी एका पॅसिफिक महासागरातील प्लास्टिक जर बाहेर काढून जर ते जमिनीवर ठेवायचं म्हणलं तर अर्धे विश्रामबाग नाही, अर्धी सांगली नाही, अर्धा महाराष्ट्र नाही तर अर्धा भारत तीन फूट उंचीने खचाखच भरेल इतका प्लास्टिक कचरा केवळ त्या एक नंबरच्या पॅसिफिक महासागरात आपल्या आढळेल. उरलेल्या चार महासागरांचा विचार आपण इथं केलेला देखील नाही. याच महासागराला GPGP म्हणजेच ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असंही आता म्हणतात. सर्वसाधारण पाच लाख कोटी प्लास्टिक आजच्या घडीला पाण्यात तरंगत आहे.

पण समुद्रात प्लास्टिक आहे तर मग त्याचा आपल्याला तोटा काय असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येतो. बहुतांशी लोकांना हे माहितीच नाही की सजीव सृष्टीला जगण्यास जो प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन लागतो तो केवळ जमिनीवरील वनस्पतींपासूनच मिळतो असे नाही. तर एकूण ऑक्सिजन पैकी 60 ते 70 टक्के ऑक्सिजन हा आपल्याला समुद्री वनस्पती पासून मिळतो. पण जर अशा समुद्रात वर प्लास्टिक तरंगत असेल तर समुद्राच्या तळाशी सूर्यकिरण पोहोचूच शकत नाहीत. त्यामुळे समुद्री वनस्पती ऑक्सिजन निर्मिती करू शकत नाहीत. 

पर्यायाने आपल्याला ऑक्सिजन कमी मिळते. इथे आपण जमिनीवरीलच झाडे जर वाचवू शकत नसू तर समुद्राच्या खोल तळाशी असलेल्या या समुद्री वनस्पती आपण कशा बरे वाचू शकणार? आणि या पाण्यात सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिक मुळे एक लाख कासवं दरवर्षी मरत आहेत. लाखो समुद्री पक्षी, प्राणी देखील दगावत आहेत. एकदा वापरून कचऱ्यात पडलेले प्लास्टिक 800 ते 1000 वर्षे तसेच राहते.

पण मग यावर उपाय तो काय? 

4R's चा वापर करून आपण हे मोठमोठाले आकडे नक्कीच कमी करू शकतो. 

Refuse -reduce - reuse recycle 

सर्वात आधी आपण बघूयात refuse and reduce बद्दल. नाही म्हणता आलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपण जाताजाता टाळू शकतो त्याचा यामध्ये समावेश होतो. आजकाल आपण कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो की मेनू कार्डच्या आधी मिनरल वॉटर बाटल्या टेबलावर येतात. त्या बदल्यात आपण RO फिल्टर पाणी मागवू शकतो. प्रत्येक हॉटेलला RO फिल्टर बसवणं बंधनकारक असतं, किंवा बाहेर फिरायला जाताना आपण आपल्या घरातूनच स्टीलच्या, काचेच्या, मातीच्या बाटलीतून पाणी घेऊन जाऊ शकतो. अगदीच शक्य नसेल ,अशा ठिकाणी आपण मिनरल वॉटर घेऊ शकतो. 

बाजारातून प्रत्येक वस्तू खरेदी केल्यावर आपल्याला ती वस्तू प्लॅस्टिक पिशवी मधून मिळते. वेगवेगळी फळे घेतल्यास ती सर्व फळे वेगवेगळ्या पिशवीत घालून दिली जातात. एखाद्या बेकरीतून बिस्किटे, ब्रेड यांसारखे वेगळे पदार्थ घेतल्यावर देखील ते पुन्हा वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून मिळतात. वास्तविक त्याची अजिबातच गरज नसते. त्यापेक्षा बाहेर जातानाच एक पिशवी कायम आपण आपल्याजवळ ठेवल्यास मिनिटाला कचऱ्यात पडणाऱ्या लाखो पिशव्यांचा कचरा आपण कमी करू शकतो. मेडिकल मधून औषधे घेतल्यावर देखील ती सुद्धा हल्ली प्लॅस्टिक पिशवीतून आपल्याला दिली जातात. तिथे आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. 

तसंच दिवसाची सुरुवातच आपण करतो ती प्लॅस्टिकच्या टूथब्रशने. पृथ्वीवरील एकूण प्लॅस्टिक कचऱ्यापैकी बहुतांश कचरा हा प्लॅस्टिक टूथब्रशचा आहे. आपल्या हयातीत वापरलेले सर्व प्लॅस्टिक टूथब्रश अजूनही पृथ्वीवर पडून आहेत. तर मग याला पर्याय काय? तर आज बाजारात बांबू पासून बनवलेले अनेक टूथब्रश उपलब्ध आहेत. केवळ टूथब्रशच नव्हे, तर बांबू पासून विविध पर्यावरण पूरक वस्तू बनवल्या जातात,ज्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध आहेत. 

हॉटेल मधून पार्सल आणल्यास किंवा ऑनलाईन ऑर्डर केल्यास बरेचसे गरम अन्नपदार्थ हे प्लॅस्टिक कंटेनर मधून आपल्याला घरपोच मिळतात. गरम पदार्थ प्लॅस्टिकमधून आपल्याला आल्यास अन्नपदार्थांमध्ये मायक्रो प्लॅस्टिक येऊ शकते. किंवा साधारण प्लॅस्टिक वितळून नकळतपणे ते आपल्या पोटात जाऊ शकते. मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करताना आपण सर्रास प्लॅस्टिक डब्यांचा वापर करतो. हे शरीराला अतिशय हानिकारक आहे. या ऐवजी आपण पार्सल आणण्यासाठी घरातील स्टीलचे डबे वापरू शकतो. मायक्रोवेव किंवा इतर वस्तूंसाठी आपण काचेची भांडी वापरू शकतो. 

युज अँड थ्रो च्या आजच्या या जमान्यात अनेक वस्तू वापरून सर्रास टाकून दिल्या जातात. घरात भिशी वाढदिवस पार्टी यासाठी अनेक वेळा प्लॅस्टिकच्या डिशेस, पाण्याचे ग्लास वापरले जातात आणि ते तसेच कचऱ्यात फेकले जातात. त्याऐवजी आज बाजारात उपलब्ध असलेले पर्यावरण पूरक असे उसाच्या चिपाडा पासून किंवा सुपारीच्या पानांपासून तयार झालेले डिशेस, ग्लास, द्रोण हे पर्याय वापरू शकतो.

याहूनही भयानक म्हणजे दररोज अनेक चहाच्या गाड्यांवर मिळणारा पेपर कप. या पेपर कप मधून चहा किंवा अन्य कोणताही गरम पदार्थ पिणे हे मानवी शरीराला अतिशय हानिकारक आहे. कारण कोणत्याही पेपर कपच्या आतमध्ये अगदी पातळ असा प्लॅस्टिकचा कोट असतो. जेव्हा आपण गरम पदार्थ या कप मधून पितो तेव्हा आतील प्लॅस्टिक त्या गर्मीने वितळण्याची शक्यता असते, आणि ते वितळलेले प्लॅस्टिक आपल्या पोटात जाऊ शकते. त्याऐवजी पूर्वीप्रमाणे प्रत्येक चहाच्या गाड्यावर स्टील किंवा काचेचे कप असतात आपण आवर्जून अशाच कपातून चहा किंवा कॉफी घ्यावी. 

अशाच प्रकारे आपण अनेक वस्तू reuse recycle करू शकतो. याचा अर्थ असा नाही की आज घरातील सर्व प्लॅस्टिक वस्तू कचऱ्यात टाकाव्यात आणि त्याऐवजी नवीन वापराव्यात. जोपर्यंत एखादी वस्तू वापरात आहे किंवा ती सुस्थितीत आहे, तोपर्यंत आपण ती वस्तू नक्कीच वापरू शकतो. जेव्हा ती वस्तू खराब होते तेव्हा ती इतर कचऱ्यात न टाकता आपण रिसायकलिंगसाठी देऊ शकतो आणि त्या ऐवजी नवीन वस्तू खरेदी करताना बाजारात त्याला पर्यायी पर्यावरण पूरक वस्तू उपलब्ध आहे का? हे आपण पाहून अशा वस्तू घेऊ शकतो. 

मुख्य म्हणजे टाकण्या योग्य प्लॅस्टिक कचरा हा योग्य त्या पद्धतीने रिसायकलिंगला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरात नेहमीच्या कचरा पेटी जवळ एखादी पिशवी किंवा दुसरा एखादा डबा ठेवून त्यामध्ये आपल्या घरातील रोजचा प्लॅस्टिक कचरा वेगळा ठेवू शकतो. वेगळा ठेवलेला प्लॅस्टिक कचरा हा रिसायकलिंग साठी देता येतो. सांगली शहरात देखील पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन यांच्यावतीने संपूर्ण सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी गोळा केला जातो. त्यांनी प्लॅस्टिक जागृती चळवळ नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यायोगे जमा झालेले सर्व प्लॅस्टिक रिसायकलिंग साठी दिले जाते. 

त्यापासून पुन्हा वेगवेगळे प्लॅस्टिक प्रॉडक्ट बनवले जाऊ शकतात. पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन यांनी साधारण हजार ते बाराशे घरे, पंधरा शाळा महाविद्यालये, काही हॉस्पिटल्स, आठ-दहा हॉटेल्स आपल्या या उपक्रमात जोडली आहेत. त्यांच्याकडून दर महिन्याला एकूण चौदाशे ते पंधराशे किलो प्लॅस्टिक संकलित होते. 

विविध शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये, महिला मंडळ, संस्थांमध्ये जाऊन हे सदस्य प्लॅस्टिक संकलनाची माहिती देऊन जनजागृती करत असतात. या चळवळीत आपण देखील सहभागी होऊ शकता आणि आपल्या घरातील, परिसरातील सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून या संस्थेकडे देऊन प्लॅस्टिक जागृती चळवळीत आपला खारीचा वाटा उचलू शकता. 

आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्काने प्रदूषित आणि प्लॅस्टिकने वेढलेली पृथ्वी देण्यापेक्षा स्वच्छ सुंदर हरित पृथ्वी पुन्हा एकदा दाखवण्याचा संकल्प आपण या वसुंधरा दिनानिमित्त करूया.