Sangli Samachar

The Janshakti News

महावितरणकडून दरवाढीचा शॉक; घरगुती वीज ग्राहकांसाठी ३५ टक्क्यांची वाढ



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
मुंबई  - महावितरण कंपनीने मोठी वीज दरवाढ सोमवारपासून लागू केली असून स्थिर आकारातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या दरांमध्ये सुमारे २५ ते ३५ टक्के इतकी वाढ झाली असून कृषी, व्यापारी, औद्याोगिक अशा सर्वच वीज ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. 

महावितरण कंपनीने स्थिर आकारातही मोठी वाढ केली असून कृषी ग्राहकांसाठीचा वीजदर प्रति युनिट ४.१७ रुपयांवरून ४.५६ रुपये इतका करण्यात आला आहे. तर कृषी इतर वापरासाठीचा वीजदर ६.२३ रुपयांवरून ६.८८ रु. इतका करण्यात आला आहे. होगाडे यांनी गेल्या दोन वर्षातील वाढीचा व अन्य वाढीचा आढावा घेऊन खरी दरवाढ ही कृषीसाठी ३८.१८ तर कृषी इतर वापरासाठी ४८.२८ टक्के इतकी असल्याचे नमूद केले आहे.


राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण कंपनीच्या वार्षिक ताळेबंद व नवीन वीजदरांना काही काळापूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे कंपनीने एक एप्रिल २०२४ पासून नवीन वीजदर लागू केले आहेत. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी या दरवाढीला कडाडून विरोध केला आहे. वीज कंपन्यांची अकार्यक्षमता व गळतीमुळे त्यांना तोटा होत आहे. मात्र तोटा झाला की दरवाढ करुन त्याचा बोजा वीजग्राहकांवर टाकायचा, ही सरकारी मनोवृत्ती वीज कंपन्यांमध्ये भिनलेली असल्याची टीका होगाडे यांनी केली आहे.