Sangli Samachar

The Janshakti News

जागावाटपाचा तिढा काय सुटेना ! माेहिते-पाटील व वसंतदादा पाटील घराण्याच्या वारसदारांवरच संघर्षाची वेळ जाईना !



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
सांगली  -  पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडी व महायुतीत पेच-डावपेच सुरू आहेत. भाजपची माढा, तर काँग्रेसची सांगलीच्या जागेवरून कोंडी झाली आहे. या दोन्ही मतदार संघात बंडाळीची शक्यता गडद झाली आहे. माढ्याचा 'पाढा' आणि सांगलीचा 'सांगावा' याची 'दिल्लीश्वर' दखल घेणार का ? माढ्यात मोहिते-पाटील, तर सांगलीत वसंतदादा पाटील घराण्यातील वारसदारांवर उमेदवारीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

माढा व सांगली पश्चिम महाराष्ट्रातील शुगरबेल्टमध्ये येणारे चर्चेतील लोकसभा मतदारसंघ. सध्या दोन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. सांगलीत संजय पाटील (काका) तिसऱ्यांदा, तर माढ्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर दुसऱ्यांदा भाजपकडून नशीब अजमावत आहेत. सांगली व माढ्यात अंतर्गत कलहातून उमेदवार बदलले जातील, अशी अटकळ बांधली गेली, मात्र भाजप नेतृत्वाने पुन्हा विद्यमान खासदारांनाच पसंती दिली. माढ्यात मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील भाजपचे प्रबळ दावेदार समजले जात होते.

भाजपने त्यांना डावलल्याने मोहिते-पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांचे चुलते जयसिंह मोहिते-पाटील यांनी 'आमचं ठरलयं…आता तुतारी', असे सांगत खासदार शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. अशावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास नवल वाटू नये.

रामराजे गट मदतीला धावणार?

भाजपकडून उमेदवारीची घाेषणा झाल्यानंतर माेहिते-पाटील समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी धैर्यशील माेहिते-पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला माेहिते-पाटील व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटाचा तीव्र विराेध आहे. माेिहते-पाटील यांनी बंडखाेरी केल्यास त्यांना रामराजे गटाची ताकद मिळू शकते. भाजपकडून माेहिते-पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी धैर्यशील माेहिते पाटील समर्थक माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. तांत्रिकदृष्ट्या रणजितसिंह माेहिते-पाटील भाजपमध्ये दिसतील. मात्र, कुटुंबिय धैर्यशील माेहिते-पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावेल, असे चित्र आहे.

काेणाला फायदा, काेणाला फटका?

धैर्यशील माेहिते-पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहिते पाटील यांचे पुतणे आहेत. माेहिते-पाटील घराण्याला साेलापूर व माढा मतदारसंघात माननारा गट आहे. धैर्यशील माेहिते-पाटील यांनी बंडखाेरी केल्यास दाेन्ही मतदारसंघात भाजपची वाट बिकट हाेणार आहे. साेलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना, तर बारामतीत सुप्रिया सुळे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माेहिते-पाटील यांच्या भूमिकेचा फायदा हाेऊ शकताे. साेलापूर जिल्ह्यात जशी माेहिते-पाटील घराण्यावर उमेदवारीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे, तशी सांगलीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर आली आहे.

महाविकास आघाडीत मिठाचा खडा

वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांची काँग्रेसची उमेदवारी पक्की मानली जात हाेती. मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गटाने काेल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर दावा केल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी घाेषीत केल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला. काँग्रेससाठी पाेषक वातावरण असताना हक्काची जागा गमावण्याची नामुष्की पक्षावर ओढविली आहे. राज्यात पक्षाचे नेतृत्व केलेल्या घराण्यातील वारसदारालाच उमेदवारीसाठी यातायात करावी लागत आहे. गतवेळी अखेरपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारीचा घाेळ न मिटल्याने विशाल पाटील 'स्वाभिमानी'च्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. आता पुन्हा तीच वेळ आली आहे.

मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव

सांगलीच्या जागेवरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मंत्री डाॅ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांच्यासह विशाल पाटील यांनी दिल्ली दरबारी धडक मारली. मात्र, अद्याप उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. ठाकरे गट उमेदवारी मागे घेण्यात राजी हाेत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जिल्ह्यातील काँग्रेसजणांनी ठेवला आहे. मात्र त्यावरही निर्णय हाेत नसल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. या परिस्थितीत विशाल पाटील वेगळ्या वाटेवर चालल्यास आश्चर्य वाटू नये.