Sangli Samachar

The Janshakti News

फडणवीसांनी मारले एका दगडात तीन पक्षी; शिंंदेंची हवा काढली



सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
मुंबई  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून एका दगडात तीन पक्षी मारले. ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही, म्हणून आपल्या पुत्राचा कल्याण मतदारसंघ जाहीर करायचा नाही, अशी खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळली होती. त्यामुळे न सुटणारा तिढा कल्याणचा उमेदवार जाहीर करून फडणवीस यांनी शनिवारी संपविला.

आता ठाणे मतदारसंघ राखण्याची कसरत शिंदे यांना करावी लागेल. कल्याण पूर्वेतील भाजपचे जे पदाधिकारी शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचे इशारे देत होते, त्यांना फटकारले. सध्या शिंदेसेनेत अस्वस्थ असलेल्या आमदार, पदाधिकारी यांना राज्यातील सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला. भाजपवर दबाव वाढविण्याकरिता शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातील उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली नाही. ठाणे सुटत नाही, तोपर्यंत कल्याण जाहीर न करता भाजपवर दबाव वाढवायचा हीच त्यांची खेळी होती. यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, असा शिंदे यांचा कयास होता. फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, असे जाहीर करून ठाणे मतदारसंघावरील भाजपचा दावा प्रबळ केला.


कल्याण पूर्वेत भाजप व शिंदेसेनेत प्रचंड संघर्ष सुरू होता. याच संघर्षातून आ. गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे तेथे भाजप-शिंदेसेनेतून विस्तव जात नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावलेल्या झूम मिटिंगवर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी सायंकाळी बैठक घेऊन शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला व भाजपने कल्याण लोकसभा लढवावी, असा आग्रह धरला. फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून स्वपक्षाच्या कल्याण पूर्वेतील नाराजांना थेट संदेश दिला.