Sangli Samachar

The Janshakti News

अबब... चेन्नईतील अटक केलेल्या भाजप कार्यकर्त्याकडे सापडली इतकी मोठी रक्कम


सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४

चेन्नई - लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आहे, तसेच सरकारी मालमत्ता,सरकारी गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी आणली जाते. निवडणुकीच्या काळात जास्त घोटाळे होण्याची शक्यता असते. असाच एका प्रकार चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडला.रात्री उशिरा नेल्लई एक्स्प्रेस ट्रेनमधून ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन तिघंजणं रेल्वेने प्रवास करत होते.

सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. या काळात कोणताही बेकायदेशीर प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवल्या जातात. ४ कोटी पेक्षा जास्त रक्कम घेऊन पळून जात असलेल्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी ४ कोटी रुपये रक्कम सहा पोत्यांमध्ये घेऊन पळून जात होते. हा पैसा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वापरायचा होता.

चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेले पैसे पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश,त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल या तिघांचा समावेश आहे. भाजपचे लोकसभा उमेदवार नयिनर नागेंद्रन यांच्या टीमने सांगितलेल्या सूचनेनुसार सतीशने थिरुनेलवेली येथे काम केले, असे सांगत त्यांनी कबुली दिली आहे.


चेंगलपट्टूचे जिल्हा निवडणूक आयुक्त म्हणाले, चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकात शनिवारी भरारी पथकाने ४ कोटी रुपये रक्कम जप्त केली. जप्त करण्यात आलेली ही रक्कम पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. प्राप्तिकर विभाग जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची चौकशी करणार आहे. कारण ही रक्कम १० लाखांच्या वर आहे. आदर्श आचारसंहितेनुसार निवडणूक काळात १० लाखांच्या वरील रकमेची चौकशी करणे बंधनकारक आहे, असे चेंगलपट्टूचे जिल्हा निवडणूक आयुक्त यांनी सांगितले आहे. जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम प्राप्तिकर विभागाला पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे, असे अधिकारी म्हणाले.