Sangli Samachar

The Janshakti News

राऊत साहेब, पत्रकारांचं काय चुकलं ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१९ एप्रिल २०२४

महाविकास आघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यामध्ये सांगलीत काँग्रेस सोबत येणार का ? काँग्रेसचे मनोमिलन होणार का ? या प्रश्नावर राऊत यांनी म्हटले, काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या सोबत आहे, तशीच ती सांगलीतही आहे. ज्याअर्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत आमच्या सोबत आहेत, त्याअर्थी काँग्रेस आमच्या सोबत आहे. आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही. आणि काही नसलं तर उगाच काड्या वगैरे घालण्याचा प्रयत्न करू नका. असे अजब उत्तर दिले. 

डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीबाबत पत्रकारांनी विचारले असता, राऊत म्हणाले विश्वजीत कदम त्यांच्या काही वैयक्तिक कामांमध्ये बाहेर आहेत. एक दोन दिवसात तेही आमच्या सोबत दिसतील. विशाल पाटील बंडखोरी मागे घेणार का ? या प्रश्नावर राऊत यांनी विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातीलच आहेत. अर्ज भरला म्हणजे बंडखोरी होत नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांचे समजूत घालू. ते अर्ज मागे घेतील. सांगलीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार. 


यानंतर काही पत्रकारांनी राणे यांच्या वरून राऊत यांना छेडले असता, त्यांचा पारा चढला, व त्यांनी पत्रकारांना काही बोलू न देता म्हटले, त्यांनी उल्लेख काय केला हे सांगा ना ? असे म्हणून त्यांनी राणेंवर बोलण्याचे टाळले. आणि फक्त सांगलीवर बोला असे सुनावले. तरीही पत्रकारांनी राणेंच्यावर प्रश्न विचारतातच राऊत भडकले. ते म्हणाले, मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उपयोग करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चाळीस वर्षे काम केलेले आहे. मीही पत्रकार आहे, मी संपादक आहे, मला मराठी भाषा कोणी शिकवू नये. असे म्हणून त्यांनी पत्रकारांना ठणकावले.

विशाल पाटील यांच्यामुळे सांगलीतील महाआघाडीची जागा धोक्यात असल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. एकंदरीत सांगलीतील वस्तुस्थितीला प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या पद्धतीने प्रसिद्धी मिळाली, त्यावर राऊत नाराज असल्याचे जाणवले. मात्र एक प्रश्न विचारावासा वाटतो, 
"राऊत साहेब पत्रकारांचं काय चुकलं ?"

पत्रकारांनी वस्तुस्थितीजन्य वार्तांकन केले हे चुकलं की तुम्हाला प्रश्न विचारलं हे चुकलं ?