Sangli Samachar

The Janshakti News

उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२८ एप्रिल २०२४
भाजपनं मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपला जन्म हनुमान जयंतीला झाल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्यासमोर कुठलंही आव्हान नसल्याचं म्हटलं आहे.

निकम म्हणाले, "वर्षा गायकवाड या माझ्याविरोधातील उमेदवार आहेत याची मला कल्पना आहे. त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे याची मला कल्पना आहे. पण माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे. मी आत्तापर्यंत मुंबईत अनेक महत्वाचे खटले चालवले त्यात देशाची सुरक्षा, देशाचं सार्वभौमत्व आणि त्याचप्रमाणं संघटित गुन्हेगारीपासून या मुंबापुरीला वाचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं कुठलंही आव्हान स्विकारण्याची माझी तयारी आहे. जळगावच्या कडक उन्हात मी वाढलो आहे. राजकारण करणार नाही याची मी ग्वाही देतो" 

राजकीय चाली खेळण्याचे उद्योग करणार नाही

मी एवढीच सर्वांना खात्री देईल की या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व मनोहर जोशी, रामदास आठवले आणि तरुण पूनम महाजन यांनी देखील केलं आहे. लोकशाही सुदृढ होण्याकरता याचं मी पालन करेन याची मी ग्वाही देतो. त्यामुळं राजकारणात कशापद्धतीनं पावलं उचलायची कशा रितीनं चाल खेळायची या उद्योगात मी आजिबात पडणार नाहीत. मला याचीही कल्पनाही आहे की वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत. 

माझ्याकडं वागताना-बोलताना मी कोर्टातही प्रतिस्पर्ध्यांना कधीही कमी लेखलं नाही पण त्यांना जोखण्याचा मात्र प्रयत्न केला आहे. हे करताना माझी कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घेईन. राजकारणातून समाजहित आणि देशहितही जोपासायता येतं हा आत्मविश्वास मी आज व्यक्त करतो. 

माझा प्रचार कसा करायची याची जबाबदारी फडणवीसांवर

प्रचार कसा असावा याची जबाबदारी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवेली आहे. मला पक्षानं जे काम दिलं आहे त्यासाठी मी संसदेत काम करेन. पूनम महाजन या मला नवीन नाहीत. त्यांचे वडील प्रमोद महाजन यांचा खटला चालवत असताना त्यांच्याशी वारंवार संपर्क होत होता. या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.

माझा हनुमान जयंतीचा जन्म असल्यानं मी कोणालाही कमी लेखत नाही. सत्यासाठी आणि न्यायासाठी झगडणं हे माझ्या रक्तात आहे. त्यामुळं आजपर्यंत ४०-५० वर्षांच्या वकिलीच्या व्यवसायात कोणत्याही आरोपीचं प्रतिनिधित्व केलेलं नाही.

भाजप देशाचं संविधान बदलणार का? यावर केलं भाष्य

राजकारणात आरोप केल्यानंतर त्याला कशापद्धतीनं उत्तर द्यायचं याबाबत आमचे राजकारणातील धुरंदर लोक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन. त्यातून कायदेशीर सामाजिक अशांतता होणार नाही, अशा प्रकारे मी स्टँड घेईन याची मी ग्वाही देतो. राजकारणात स्पष्टवक्तेपणा चालत नाही, हे मला ठावूक आहे पण माझा हा निर्भिड आणि निस्पृह स्वभाव मी कायम जोपासणार आहे, हे तुम्हाला दिसून येईल.