Sangli Samachar

The Janshakti News

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाकडून अचानक तपासणी| सांगली समाचार वृत्त |
निलगिरी - दि.१६ एप्रिल २०२४
काँग्रेस नेते राहुल गांधी हे तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ते गेले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तपासणी केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात निघाले होते. प्रचारसभेला पोहचण्यासाठी ते हेलिकॉप्टरने निलगिरीत दाखल झाले होते.

निवडणूक आयोगाने ७५ वर्षांच्या इतिहासात यावेळी सर्वाधिक रोकड जप्त केली आहे. तपासातून कोणत्याही मोठ्या नेत्याला सूट दिली जात नाहीय. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडुत निलगिरीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. त्यावेळी निवडणुक आयोगाच्या फ्लाइंड स्क्वाडचे अधिकारी हेलीपॅडवर पोहोचले. त्यांनी राहुल गांधी ज्या हेलिकॉप्टरमधून आले त्याची तपासणी केली.


राहुल गांधी सलग दुसऱ्यांदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधींनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारांतर्गत सोमवारी सुल्तान बठेरीमध्ये मोठा रोड शो केला. राहुल गांधी तामिळनाडुत निलगिरी जिल्ह्यात गेले. त्यांनी कला आणि विज्ञान कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानतंर रस्ते मार्गाने केरळमधील सुल्तान बठेरी इथं पोहोचले.

सुल्तान बठेरीमध्ये राहुल गांधी यांनी ओपन रूफ कारमधून रोड शो केला. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते राहुल गांधी यांचे फोटो असलेले बॅनर घेऊन चालत होते. राहुल गांधी पुलपल्ली इथं शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करणार आहेत. पुलपल्लीमध्ये शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. इथं शेतकरीही जास्त आहेत.

राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक मोठा रोड शो केला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी वायनाड मतदारसंघात प्रचार सुरू केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये ४ लाख ३१ हजार ७७० मतांनी विजय मिळवला होता. केरळमध्ये २० लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे.