सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
हातकणंगले - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आज बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. हातकणंगलेतून सत्यजित पाटील -सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगलेतून धैर्यशील माने शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. या आधी खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी अशी दुरंगी लढतीची चर्चा मतदारसंघात असतानाच आता ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा उमेदवार उतरवला आहे. यामुळे हातकणंगलेत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने येथून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे.
हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेकडे आहे. येथून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, असा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. मात्र राज्यातील नेत्यांनी राजू शेट्टी हे शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असतील तरच त्यांना पाठिंबा द्यावा; अन्यथा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करावा, अशी भूमिका मांडली. दरम्यान, शेट्टी यांनी दोनवेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिल्याने तेथून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला आहे.