Sangli Samachar

The Janshakti News

अन्यथा काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; भाजपा नेत्याचा पक्षाला घरचा आहेर



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
पलूस - सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सांगलीतून आधीच चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेस नेते चांगलेच संतापले आहेत. 

काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. वरिष्ठांकडून या जागेबाबतचा निर्णय झाला असला तरी कार्यकर्ते आक्रमक झाले असून विशाल पाटील हे बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहात. दुसरीकडे सांगतील भाजप नेत्याने पक्षालाच खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेस सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात भाजप नेत्याने पक्षाला घरचा आहेर दिला आहे.


विश्वासात घेऊन काम नाही केले, तर काँग्रेसची जी अवस्था आहे, तशी भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही,अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी भाजपाच्या मंत्री सुरेश खाडे यांच्यासह नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज देशमुखांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचे म्हटलं जात आहे. पृथ्वीराज देशमुख हे माजी आमदार आणि माजी सांगली जिल्हाध्यक्ष आहेत. पृथ्वीराज देशमुख हेसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने सांगली भाजपात वातावरण आधीच तापलं होतं. अशातच देशमुख यांनी पक्षाच्या लोकांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले पृथ्वीराज देखमुख ?

सांगली लोकसभा निवडणुक निमित्ताने पलूस येथे आयोजित बूथ संम्मेलन कार्यक्रमात ते बोलत होते. "लोकसभेसाठी मी सुद्धा मागणी केली होती. पण आम्हाला बोलवून सांगायला हवं होतं या कारणासाठी तुम्हाला तिकीट देणार नाही. आम्हाला काहीच अडचण नव्हती आणि पक्षावर आमचा आजही राग नाही. पण विश्वासात घेऊन कुणी काम नाही केलं तर काँग्रेसची जशी अवस्था आहे तशी आपली व्हायला वेळ लागणार नाही," असे पृथ्वीराज देखमुख म्हणाले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर देखील आगपाखड केली आहे. पलूस मतदार संघात पक्षाचा कार्यक्रम करून,आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहणार आणि आम्ही पक्ष म्हणून मत देणार. आता परत पाच वर्ष तेच करणार असाल तर आम्हाला यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा शब्दात खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पृथ्वीराज देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.