Sangli Samachar

The Janshakti News

निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१५ एप्रिल २०२४ -
लोकसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले.

४४-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे २०२४ रोजी मतदान होत असून लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले, निवडणुकीदरम्यान नगदी रक्कम तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बाबींच्या वाहतुकीवर एसएसटी व एफएसटी पथकांनी निगराणी ठेवावी. संशयित वाहनांची कडक तपासणी करावी. उमेदवारांचा खर्चावर खर्चविषयक समितीने लक्ष ठेवावे. उमेदवारांचा खर्च नियमित नोंदवून त्याची माहिती सादर करावी.


कायदा सुव्यवस्था अबाधित राखा

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने घ्यावी. संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त लावावा. आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवरील चेक नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी. राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, जीएसटी व वन विभागाने समन्वयाने कारवाई करावी.

मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावी राबवा

देशात लोकशाहीचा उत्सव सुरू असून राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने मतदार जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नवीन उपक्रम राबविले जावेत. शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बूथनिहाय नियोजन करावे. अधिकाधिक मतदान व्हावे याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. मतदान टक्केवारी वाढावी यासाठी बक्षीस योजना जाहीर करण्याबाबत विचार व्हावा. प्रत्येक बुथवर किमान ७५ टक्केपेक्षा अधिक मतदान व्हावे. ज्या मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी यासाठी निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या. मतदारांना इपिक कार्ड वाटप बरोबरच वोटर स्लिप वाटपाचे 100 टक्के काम बीएलओमार्फत करावे.

मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, उन्हाळा असल्याने सावलीची सोय व अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवाव्यात. शहरी भागातील मतदान केंद्रांवर पार्किंगची व्यवस्था करावी. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करावी. प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, पुरेशी प्रकाश योजना असावी.

कामगारांना पगारी सुट्टी

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावता यावे यासाठी मतदाना दिवशी आयोगाने पगारी सुट्टी जाहीर केली आहे. कामगारांनीही या दिवशी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले.

मतदान केंद्रावर स्वच्छताअभियान

जिल्ह्यातील मतदान केंद्र व परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे असा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी बैठकीत दिल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यात निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामांची माहिती तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि कायदा व सुव्यवस्था व पोलीस विभागाची माहिती सादरीकरणद्वारे दिली.

जिल्ह्यात लोकसभा निवडणूकसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारी बाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाचे कौतुक केले.

माध्यम कक्षास भेट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रसार माध्यम कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षास आज प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांनी भेट देऊन कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

तद्नंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यान्वित करण्यात आलेला नियंत्रण कक्ष आणि मतदार मदत केंद्रास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी श्री. चोक्कलिंगम यांना माध्यम कक्ष, मतदार मदत केंद्र कक्ष व नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान व माहिती अधिकारी एकनाथ पोवार, शंकरराव पवार आदी उपस्थित होते.