Sangli Samachar

The Janshakti News

ज्या आवाजाला वसंतदादांनी मुंबईत बळ दिलं त्याच आवाजाने सांगलीत येऊन काँग्रेस विरोधी बोलल्याची खंत - विशाल पाटील



सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
मुंबईत मराठी माणसं मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांना आवाज नव्हता. तो आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने बुलंद होईल, या विश्वासाने वसंतदादांनी शिवसेनेला मुंबईत बळ दिले. पण आज त्याच ठाकरेंच्या आवाजाने सांगलीत येऊन काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध बोलल्याबद्दल आम्हा सर्वांच्या मनात खंत असल्याचे मत, सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार विशाल दादा पाटील यांनी व्यक्त केले. मुंबईत ज्या पद्धतीने बोलले जाते, तसं सांगलीत बोलून चालत नाही सांगलीकर ते स्वीकारत नाहीत हे यापूर्वीही सिद्ध झालं आहे, असं हे विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांच्याबद्दल आमच्या मनात अजूनही आदर आहे, ते जातीयवादी पक्षाच्या विरोधात पुरोगामी शक्तीचा आवाज आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. पण जशी आम्हाला त्यांची गरज आहे तशीच त्यांनाही आमची गरज असणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे व सर्वांनीच एकमेकाबद्दल आग्रहाची भावना ठेवावी असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले.


सांगली लोकसभा मतदारसंघातून कोणाची उमेदवारी हा बंद खोलीतील विषय होता. असे सांगून विशाल पाटील म्हणाले की, संजय राऊत साहेबांनी, या विषयाला सार्वजनिक केले. तरीही आम्ही सर्वजण शांत होतो, अजूनही आहोत. त्याबाबत आम्हाला काहीच बोलायचं नाही. कारण मतदार संघातील उमेदवारी हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणारा निर्णय आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, त्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा अधिकार जिल्ह्याचे नेते म्हणून डॉ. विश्वजीत कदम यांना देण्यात आला आहे. आणि याच नेत्यांवर संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने संशयास्पद वक्तव्य केले, त्यामुळे आम्हाला वाईट वाटले. चूक झाली असेल आता ती त्यांनी स्वीकारावी, आणि यापुढे आमच्या नेत्या विरोधात पुन्हा असे वक्तव्य करू नये असा 'प्रेमळ' सल्ला विशाल पाटील यांनी संजय राऊत यांना दिला.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत आघाडी म्हणून कोणताच निर्णय घेतला गेला नव्हता, असे असताना राऊत साहेब यांनी सांगलीत येऊन ज्या पद्धतीने हा विषय ताणला त्यामुळे कटुता निर्माण झाली. मुळात दोन दिवस राऊत साहेब सांगलीत का तळ ठोकून होते, हाच प्रश्न आहे. पण जे होते ते चांगल्यासाठी होते, आता त्यांच्या लक्षात आलं असेल, सांगलीकरांच्या मनात कोण आहे. त्यामुळे कदाचित त्यांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा वर्षात भाजप व येथील खासदार कसे निष्क्रिय आहेत, येथील प्रश्नाला ते न्याय देऊ शकले नाहीत हे काँग्रेस पक्षाने जनतेला पटवून दिले आहे. भाजपा आणि निष्क्रिय खासदारा विरोधात आम्ही चांगले रान पेटवले, कदाचित त्याचमुळे या पेटलेल्या रानावर कोणाला जर पोळी भाजून घ्यायची असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

खा. संजय पाटील यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल बोलताना विशाल पाटील म्हणाले की, त्यांनी भाजपचे कवच बाजूला काढून ठेवावे व चड्डी घालून मैदानात यावे, आम्हीही लांघ घालून तयार आहोत त्यावेळी कोणाची किती शक्ती आहे हे लक्षात येईल.
उद्या गुढीपाडवा आहे नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आपण सर्वांनी नव्याने सुरुवात करायची आहे असे सांगून पक्ष जो निर्णय देईल, तो आम्ही स्वीकारू पण आम्हाला सर्वांनाच खात्री आहे की उद्या महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार बैठकीत सांगली मतदारसंघ काँग्रेस जाहीर होईल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे, जे काही ठरेल  त्यावर आम्ही सर्वजण एकत्रित येऊन निर्णय घेऊ असेही विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या जयश्री पाटील, सांगलीचे माजी महापौर किशोर शहा,  आदी नेते उपस्थित होते.