Sangli Samachar

The Janshakti News

एसटी वाहकांचा कॅशलेसला विरोध का?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२६ एप्रिल २०२४
चहावाल्यापासून माॅलपर्यंत सर्वत्र युपीआयद्वारे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक हाच देव मानून त्याच्या सेवेसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. मात्र, एसटी विभागात कॅशलेस सुविधा म्हणजे डोकेदुखी, असे समजून वाहकांकडून त्याला फारसा प्रतिसाद देत नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. ट्रॅन्झक्शन पूर्ण झाले नाही, तर वाद कोण घालणार? त्यामुळे ती कटकटच नको, या विचाराने वाहक कॅशलेस सुविधेबाबत वेगवेगळी कारणे देऊन प्रवाशांकडून रोखीनेच तिकीट घेण्यास भाग पाडत आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी कॅशलेस तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून जवळपास चार लाख प्रवाशांनी या सुविधेचा वापर केला आहे. ऑनलाइन तिकिट विक्रीची सेवा सुरू झाल्याने प्रवाशांजवळ सुटे पैसे नसले, तरी क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढणे सोपे झाले आहे. त्यामुळेच प्रवाशांचा या पर्यायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून ही सुविधा केली खरी; पण प्रवासामध्ये काही भागात नेटवर्कसह अन्य अडचणींमुळे पैसे जातात; पण मशीनमधून तिकीट येत नाही. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक खडाजंगी होते. हे वाद होऊ नयेत, यासाठी काही वाहक नेटवर्क नाही, सिस्टीम बंद आहे यांसह अन्य कारणे देऊन कॅशलेस तिकीट देण्यास टाळाटाळ करतात.

मात्र, त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. अनेक  मार्गावर सुट्टे पैसे नसल्यामुळे स्कॅनर द्या, असे सांगितले, तर वाहकाकडून नेटवर्क प्राॅब्लेम आहे, असे सांगून रोख तिकीट घेण्यास सांगितले, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. मात्र, तेच एका प्रवाशाने माझ्याकडे कॅश नाही, ऑनलाइन पेमेंटच होईल, असे सांगितले. त्या वेळी सुरवातील काही वेळ वाहकाने नाहीचाच पाढा लावला. मात्र, काही वेळाने ऑनलाइन पेमेंट करून घेतले जाते.