| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२१ एप्रिल २०२४
भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरातील जैन समाजातील दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी, इ. सर्व पंथीयांच्या वतीने एकत्रित भव्य मिरवणूक आज रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता आमराई जवळील जेठाभाईवाडी येथून काढण्यात आली.
सांगलीत निघणाऱ्या या भव्य शोभा यात्रेच्या माध्यमातून भ. महावीरांचा शांती संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्या आला. या भव्य शोभा यात्रेत रथ, चांदीचे रथ आकर्षक सजावटीनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, पंचमेरु, समाजप्रबोधनात्मक देखावे यांचा समावेश असणार आहे. ही मिरवणुक श्री. जेठाभाईवाडीपासून सुरु होऊन हायस्कुल रोड, गणपतीपेठ, टिळक स्मारक मंदिर, हरभट रोड, कापडपेठ, राजवाडा चौक, रॉकेल लाईन, श्रीमती कळंत्रेआक्का जैन महिलाश्रम या मार्गाने जाऊन भ. आदिनाथ जिनमंदिर महावीरनगर सांगली येथे विसर्जित झाली.
यावेळी सांगली शहर व परिसरातील जैन श्रावक श्राविका पारंपरिक वेषात मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील व भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार संजय पाटील त्याचप्रमाणे विविध पक्षातील नेते व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जैन बांधवांना महावीर जन्म कल्याण निमित्त शुभेच्छा दिल्या.
