Sangli Samachar

The Janshakti News

सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल, निकालाची प्रत मिळणार वॉट्सॲपवरवर



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२६ एप्रिल २०२४
सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल.

सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या 'इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस'सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला.


आदेश, निकालही कळणार

सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांनादेखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठविण्यात येतील. एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता 'मेघराज क्लाउड २.०' येणार आहेत. 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'ने (एनआयसी) हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. आता न्यायालयाचा डेटा या क्लाउडवर येणार आहे.

यामुळे काय होणार ?

न्यायालयाचा वेळ अन् कागद वाचणार

दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस

जिव्हाळ्याचे विषय नागरिकांना समजतील

अधिकाधिक नागरिकांपर्यंत कोर्ट पोहोचणार