Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि.१६ एप्रिल २०२४
शिवसेनेच्या उमेदवाराचा सांगलीत कुठेही बेस नाही, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आता तरी याची जाणीव करून घ्यावी. परिणामी, शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार असल्याचे खळबळजनक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड झाल्याचेही पटोले म्हणाले. दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रफुल्ल पटेल जर जोर लावत असेल तरी ते आता लीडर राहिले नाही, तर ते डीलर झाले असल्याची बोचरी टीकाही पटोले यांनी केलीय.

प्रकाश आंबेडकर आघाडीची चर्चा करताना पाठीमागे काय खेळ करतात, हे आता सर्वांना कळले आहे. त्यामुळे यावर आताच काही बोलण्याऐवजी याचे उत्तर मी 21 एप्रिलला अकोल्यात देईन, असेही नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री आणि महायुतीचे हिंदुत्व हे नकली असून आता त्यांनी कितीही देवघरात जाऊन पूजा केली तरी काही फरक पडणार नाही, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'एबीपी माझा' च्या विशेष मुलाखतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर रोखठोक वक्तव्य करत चौफेर फटकेबाजी केलीय.


सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही

सांगलीच्या जागेवरती ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र इथून विशाल पाटलांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून असे दोनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशातच या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. मात्र जर ठाकरे गटाने आपला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटलांची समजूत काढू असेही नाना पटोले म्हणाले. सांगलीची जागा अलायन्समध्ये सुटली आहे. आम्हाला हे माहित आहे की सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा मुळात कुठेही बेस नाही. तरीसुद्धा आम्हाला महाविकास आघाडी म्हणून त्याच्यासाठी काम करावे लागणार आहे.

परिणामी, काल विश्वजीत कदम, विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडी सोबत राहण्याची सूचना आम्ही केल्या आहेत. असे असले तरी सांगलीची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झाला असल्याची खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. मात्र आम्ही महाविकस आघाडी मध्ये घटक पक्ष असल्याने आम्हाला आघाडी धर्म निभावावे लागते, असेही पटोले म्हणाले.

कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड

चंद्रहार पाटील आता शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. मात्र, चंद्रहार पाटील यांचा सांगली बेस नाही. याची जाणीव शिवसेनेने करून घ्यायला हवी. परिणामी, अजूनही वेळ गेलेली नाही. एक एक जागा मोदींना हटवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सांगलीतील लोक आणि कार्यकर्ते जसं बोलत आहेत, तसं शिवसेनेने निर्णय घ्यायला हवेत, असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला आहे. शिवसेनेने सांगलीमध्ये त्यांचा उमेदवार मागे घेतला तर आमचा एबी फॉर्म तयार आहे. मात्र, शिवसेनेने ती जागा लढवण्याचं ठरवलं असल्यामुळे आम्ही त्यांना बळजबरी करू शकत नाही. त्यांनी त्यांचा उमेदवार कायम ठेवलं तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.