Sangli Samachar

The Janshakti News

हिंदू नवं वर्षाची मंगलमयी सुरुवात करा 'या' शुभ चिन्हाच्या वापराने!



सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
मुंबई - भारतीय संस्कृती गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. हा सण हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. यावेळी दारात गुढी उभारण्याबरोबरच रांगोळी काढली जाते. तेथे विविध चिन्हांचा वापर केला जातो. यावेळेस खालील चिन्हांचा वापर करून पहा.
भारतीय स्वयंपाकघरात नारळाचा सर्रास वापर होतो तसाच तो धार्मिक विधीतही केला जातो. धार्मिक चौकटीत त्याला श्रीफळ असे म्हटले जाते आणि प्रत्येक पूजेत, शुभ कार्यात त्याचा आवर्जून वापर होतो. श्रीफळात त्रिदेव वास करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून नव वर्षाला देवपूजेत श्रीफळ ठेवून आगामी वर्ष सुख समृद्धीचे आणि आरोग्याचे जावे अशी प्रार्थना करावी. सायंकाळी ते श्रीफळ गरजवंताला दान करावे.

स्वस्तिक हे भगवान गणेशाचे स्थान. कोणत्याही कार्यारंभी आपण गणेशपूजा करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात किंवा कागदावर नाहीतर दारावर गंधाच्या बोटांनी स्वस्तिक रेखाटून गणरायाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचा आरंभ करावा.


मोर हे चैतन्याचे प्रतीक आहे. घरात उत्साह राहावा, सकारात्मक वातावरण राहावे याकरता मोरपंख लावावे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या शिरपेचात मोरपिस खोवल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले. घरात मोरपीस लावल्याने भगवान गोपालकृष्णांची कृपादृष्टी होऊन घराचे गोकुळ बनते, अशी श्रद्धा आहे.

पोपट दिसणे शुभ लक्षण मानले जाते. त्यात त्याचे गोड गोड मिठू मिठू करणे आल्हाददायक वाटते. म्हणून रोज पोपटासाठी खिडकीत खाद्य टाकावे. त्यांच्या येण्याने शुभ वार्तांचे आगमन होते. पोपटाला पिंजऱ्यात डांबून ठेवण्यापेक्षा मुक्त जीवन जगू द्यावे आणि दाणा पाणी घालून केवळ पाहुणचारासाठी बोलवावे. परंतु अलीकडे वृक्षतोड झाल्याने पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. यावर वास्तुशास्त्र उपाय सांगते, पोपटाच्या छायाचित्राचा! पोपट आणि मैनेची जोडी असलेले छायाचित्र घरात समृद्धी आणते.

हत्ती हे वैभावाचे प्रतीक आहे तर गणेश मांगल्याचे! वैभव लक्ष्मीचे वाहन हत्ती आहे. तिला पाचारण करण्यासाठी नवीन वर्षाला घरात चांदीचा किंवा लाकडाचा शोभेचा हत्ती घरात ठेवा किंवा गणेश मूर्ती वा प्रतिमा योग्य जागी लावा. घरात भरभराट होईल.

घरात शांतता, मांगल्य, समृद्धी नांदावी म्हणून कासवाचे प्रतीक आपल्या तिजोरीत ठेवावे. त्यामुळे धनवाढ होते. घरात सौख्य नांदते. स्वास्थ्य सुधारते. त्याचा सकारात्मक प्रभाव घरच्यांवर जाणवू लागतो.