सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
सांगली- लाेकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान खराडे यांची स्वाभिमानीने उमेदवारी जाहीर केल्याने हा काॅंग्रेस नेते निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांच्या गटास धक्का मानला जात आहे.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. यंदा स्वाभिमानीनेच उमेदवार जाहीर केला आहे. स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही असा स्पष्ट संकेत यातून दिसत आहे. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी वेगवेगळ्या आंदाेलनात चांगली भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठिशी शेतकरी ठाम राहतील अशी आम्हांला खात्री आहे. आमचा उमेदवार फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील आहे असेही राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना नमूद केले. दरम्यान खराडेंच्या उमेदवारीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकद आता काॅंग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुका निहाय काँग्रेसची चाचणी सुरू
सांगलीची जागा काँग्रेसलाचा मिळावी ही जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती जाणून घेऊन महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा तसेच उध्दव ठाकरेंनी देखील फेर विचार करावा असं आवाहन दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसने केले आहे.
गेले दोन दिवस तालुका निहाय काँग्रेस कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुक लढवावी की नाही हा अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा काँग्रेसकडून निर्णय घेण्यात येईल असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.