Sangli Samachar

The Janshakti News

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शिकवणारे आणि भूकंपमापन यंत्र असलेले बेंगळुरू येथील चेन्नाकेशव मंदिर !| सांगली समाचार वृत्त |
बेंगळुरू - दि.२२ एप्रिल २०२४
वर्ष १११६ मध्ये होयसळ राजवंशियांनी बांधलेले बेंगळुरू येथील चेन्नाकेशव मंदिर हे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर्शवणार्‍या कलाकृतींनी भरलेले आहे. या मंदिरात मोहिनीच्या मुख्य मूर्तीसह अन्य मूर्तीही आहेत. मोहिनी हे भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने घेतलेले स्त्रीरूप होते. मोहिनी म्हणजे अदृश्य आकर्षणाचे प्रतीक आहे. इथे मानवी रूप अभिप्रेत नसून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर्शवण्यासाठी हे प्रतिकात्मक रूप म्हणून वापरल्याचे लक्षात येते; कारण मानवाप्रमाणे या मूर्तींना नाभी दाखवलेली नाही. येथे अनेक नक्षींतून गुरुत्वाकर्षणाची अदृश्य ओढ दर्शवली आहे. एका मोहिनीच्या हातातून शेवटची बांगडी खाली येते, तर वर उचलेल्या पायातील पैंजण खाली झुकले आहे. ही कलाकृती गुरुत्वाकर्षण दर्शवते.

येथे सरस्वतीदेवीची एक अद्भुत आणि विलक्षण मूर्ती आहे, जी गुरुत्वाकर्षण रेषेचे ज्ञान लक्षात घेऊन बनवली आहे. या मूर्तीच्या मस्तकावर जलाचे थेंब पडले, तर ते नाकाच्या खालून उजवीकडून येऊन, (वर उचललेल्या) उजव्या हाताच्या तळहातावर पडून डाव्या पायाच्या तळव्यावरून उजव्या पायावर पडतात. (हे पाणी पसरत नाही, तर थेट खाली पडते, हे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे होते.)

वर्ष १९२६ मध्ये हे पहाण्यासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, महंमद अली जिना या मंदिरात आले होते.. या नेत्यांना दाखवण्यासाठी या मूर्तीला वरच्या भागातून काढून खाली आणण्यात आले. मूर्तीवर पाण्याच्या थेंबाचा प्रयोग करून दाखवण्यात आला, तेव्हा तिघेही उठून उभे राहिले !

पुजारी येथील १२ फुटी मुख्य मूर्तीला प्रतिदिन मोहिनीरूपात सिद्ध करतात. येथील गाभार्‍यात गुरुत्वाकर्षणाची व्याख्या करणारी नक्षी आहे. येथे कुणाला आत जाण्याची किंवा छायाचित्र काढण्याची अनुमती नसल्याने हे लोकांना कळू शकत नाही, हे दुर्दैव आहे !

संस्कृतमध्ये 'गुरुत्व' हा शब्द आहे. वर्ष ६२८ ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने त्याचा उल्लेख करत म्हटले, 'गुरुत्वाकर्षणामुळे मोठ्या वस्तूकडे छोट्या वस्तू आकर्षिल्या जातात.' कुदुमिआन मलईच्या प्राचीन मंदिरात मोहिनीच्या २ मूर्ती आहेत. येथे मोठ्या रूपातील मोहिनी लहान रूपातील ऋषींना आकर्षित करून घेत असल्याच्या कलाकृती आहेत. त्यामुळे मोहिनी रूप हे गुरुत्वाकर्षण सिद्धांत दाखवण्यासाठी वापरले जाते, हे यावरून लक्षात येते.

वर्ष २०२२ मध्ये १७ सप्टेंबरला या मंदिरात एक घटना घडली. या मंदिराच्या बाहेर असलेल्या उंच लोखंडी खांबावरील चेंडू खाली पडला. थोड्याच वेळात तिथे हलका भूकंप झाला. तेव्हा लक्षात आले की, भूकंप येणार असतो, तेव्हा या खांबावरील चेंडू पडतो. या खांबाखालचा दगड एका बाजूने भूमीला पूर्ण टेकलेला नाही. एका कोनातून तो भूमीला स्पर्श करत नाही, तर किंचित वर आहे. ४५ टन वजनाचा हा प्राचीन गुरुत्वाकर्षणविरोधी खांब अशा प्रकारे ३ बाजू टेकून सहस्रो वर्षे उभा आहे. भूकंपात विशाल अखंड २२ फूट खांब पडला नाही. खांबाला खालून घट्ट आधार नाही, तर आधाराविना उभा असलेला खांब आहे. आपण पेन्सिलही उभी करू शकत नाही. हा खांब अनेक वर्षे उभा आहे. भूकंप आल्यावर खांबाचा मधला भाग फिरू शकतो, वर छोट्या घंटाही आहेत, त्या वाजू शकतात, अशी रचना आहे. भूकंप मोजण्याचे अलीकडे निर्माण झालेले 'सिस्नोग्राफ' हे यंत्र भूमीला घट्ट जोडलेले नसते, जसा हा खांब आहे. त्यामुळे भूकंप आल्यावर ते हालून त्याची तीव्रता मोजता येऊ शकते. प्राचीन चिनी भूकंपमापन यंत्रातही भूकंप आल्यावर चेंडू सोडण्याची यंत्रणा होती, हे या मंदिरातील खांबावरील चेंडू पडणार्‍या यंत्रणेशी जुळणारे आहे.