Sangli Samachar

The Janshakti News

सांगली मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरांचा समतोल विकास साधणार - नूतन आयुक्त शुभम गुप्ता



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्हीही शहरांचा समतोल विकास साधला जाईल. वारणा उद्भव तसेच चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेचा प्रस्ताव तयार झाला आहे. दोन्ही प्रस्तावावर चर्चेनंतर निर्णय होईल. महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावरील बांधकामांविरोधात जुन्या अहवालाचे अवलोकन व बोगस कनेक्शनचे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त खोसे, रविकांत अडसूळ, उपयुक्त वैभव साबळे आदी उपस्थित होते. आयुक्त गुप्ता म्हणाले, शहर विकास, नागरी सुविधांबाबत गटनिहाय मूल्यांकन करून शहर हा घटक न मानता, लोकसंख्या आणि विकासाचा समतोल हे घटक म्हणून विकासकामे केली जातील. लोकाभिमुख प्रकल्प हाती घेतले जातील. आयुक्त गुप्ता पुढे म्हणाले की, सांगली मिरजेच्या ड्रेनेज योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले पडतील.


यापुढे काम पूर्णत्वासाठी ठेकेदाराला शेवटची मुदत दिली जाईल. सांगलीतील कत्तलखाना जवळील ड्रेनेजचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होईल. महापालिका शाळांमध्ये शिक्षणसुधार कार्यक्रम राबविला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती करून त्याचा अध्ययन स्तर उंचावला जाईल. आरोग्यसेवा सुविधा अधिक चांगल्या, प्रभावी केल्या जातील. वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उभारणी गतीने पूर्ण होईल. सांगलीतील अत्याधुनिक प्रसूतीगृह उभारणी आणि मिरजेतील प्रसूतीगृहाची क्षमता वाढ होईल.

महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी वारणा उद्भव योजना तसेच थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याचा योजना या दोघांचा प्रस्ताव तयार झाला आहे. वारणा उद्भव योजना 293 कोटींची, तर चांदोलीतून पाणी आणण्याची योजना बाराशे कोटी रुपयांची आहे या दोन्ही योजना वर प्रशासन चर्चा करेल, त्यानंतर शासनाला एक प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगण्यात आले. महापालिका क्षेत्रात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याला प्राधान्य राहील.

महापालिकेच्या खुल्या जागेवर बी ओ टी अथवा भाडेतत्त्वावर दुकानदारांचे बांधकाम करून, दुकानदारांचे पुनर्वसण्याचा प्रयत्न राहील. नवीन खोकी उभारली जाऊ नयेत, याबाबत कटाक्ष राहील. फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. त्यांना गाळे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य राहील, असे गुप्ता यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रात बोगस कनेक्शन शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. बोगस कनेक्शन आढळल्यास सध्या पाच हजार रुपये दंड केला जातो. मोठे अपार्टमेंट, व्यावसायिक अपार्टमेंट इमारतीत बोगस कनेक्शन आढळल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे.

नागरिकांच्या तक्रारीसाठी महापालिकेत मंगळवारी तक्रार निवारण कक्ष कार्यवाही केला आहे, नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. मालमत्ता सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे. मालमत्ता मोजणीत चूक झाल्याच्या वेळेत दुरुस्ती केली जाईल. जिओ फेसिंगद्वारे कर्मचाऱ्यांवर वॉच राहील. कर्मचारी कामाच्या क्षेत्र क्षेत्राबाहेर गेल्यास यंत्रणेला कळेल. काम चुकारपणाला आळा बसेल, असे आयुक्त गुप्ता ज्यांनी सांगितले.