Sangli Samachar

The Janshakti News

एप्रिल ते जून या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यतासांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज ( दि. १ एप्रिल ) भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी एप्रिल ते जून या काळात मैदानी भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्‍याचे म्‍हटले आहे. एप्रिल ते जून महिन्‍यांमध्‍येच देशभरात लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. या काळात देशातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवमान विभागाने आपल्‍या 'प्रसिद्धी पत्रकात' नमूद केले आहे.

एप्रिल-जून महिन्यात या राज्‍यांमध्‍ये उष्‍णतेच्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम

हवामान खात्याने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, 'एप्रिल ते जून दरम्यान देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे. या दरम्यान उष्णतेची लाट सुमारे 10 ते 20 दिवस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागातही तापमानात बदल दिसू शकतो. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल.'


देशातील अनेक भागात तीव्र उष्मा असेल

हवामान विभागाच्या मते, एप्रिल आणि जून महिन्यांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, एप्रिलमध्ये देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, मध्य दक्षिण भारतात ही शक्यता अधिक आहे.

आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता - महापात्रा

नेहमीच एक ते तीन दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट दोन ते आठ दिवस राहण्याची शक्‍यता असल्‍याचे हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्‍हटले आहे.