Sangli Samachar

The Janshakti News

आईच्या ऑपरेशनसाठी फोडलं शेजाऱ्याचं घर; कायद्यापुढे माणुसकी हतबल| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.२ एप्रिल २०२४
पैशांची चणचण असल्याने आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका व्यक्तीने शेजाऱ्याचं घर फोडलं. घर फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड पैसे लंपास केले. ही घटना बिबवेवाडीत घडली असून पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावत चोराला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव दिपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे आहे. आरोपी बिबवेवाडीतील बहुमजली सोसायटीत सहाव्या मजल्यावर राहत होता. दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात त्याच्या शेजारी राहणारे एक कुटूंब त्यांच्या मुळगावी गेले होते. ही संधी साधत आरोपीने हॉलच्या बाल्कनीच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.


या चोरी प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी याचा तपास सुरू केला. या तपासात चोरी करणारा चोरटा त्या शेजारीच निघाल्याने पोलीस आवाक झालेत. आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून दिपकने शेजाऱ्याचं घर फोडत रोकड लंपास केली.

आर्थिक चणचण असल्याने दीपक पाटोळे यांनी चोरी केली. दीपकचा हा पहिलाच गुन्हा असला आणि जरी आईच्या ऑपरेशनसाठी त्याने हे कृत्य केले असले तरी शेवटी गुन्हा तो गुन्हाच. म्हणूनच कायद्यापुढे माणुसकी हतबल असेच म्हणावे लागेल.