Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रात काँग्रेसची कोंडी



सांगली समाचार - दि.५ एप्रिल २०२४
मुंबई  - महाविकास आघाडीतील जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमकता कायम ठेवल्यामुळे काँग्रेसला सांगली व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडावा लागणार आहे. भिवंडी मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे गेल्यातच जमा आहे. आता मुंबईतील उरल्या सुरल्या दोन जागांवरच काँग्रेसला समाधान मानावे लागणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस व शिवसेना यांच्यात सांगली व दक्षिण मध्य मुंबई आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात भिवंडी मतदारसंघावरुन वाद सुरु आहे. मात्र शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. काँग्रेसही सांगली मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार नाही. परंतु सांगलीतून माघार घेण्यास उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. सांगलीच्या बदल्यात कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे, रामटेक व अमरावती हे शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ काँग्रेसला सोडले आहेत, त्यामुळे काँग्रेसने सांगलीचा आग्रह सोडावा, असे त्यांनी म्हटले आहे. सांगलीत मैत्रिपूर्ण लढतीची चर्चा आहे, त्यावर अशी लढत झाली तर ते धोक्याचे ठरेल, असा इशाराही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.


मुंबईत दोन जागाच शक्य

शिवसेना व काँग्रेस यांच्यात सांगलीप्रमाणे मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावरुनही वाद अजून धुमसत आहे. शिवसेनेने मुंबईतील चार जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी दक्षिण मुंबई, इशान्य मुंबई व वायव्य मुंबई मतदारसंघातील त्यांचे उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार उत्तर मध्य मुंबई व उत्तर मुंबई हे दोनच मतदारसंघ काँग्रेसेच्या वाटय़ाला येतात. दक्षिण मध्य मुंबई ही जागाही काँग्रेसला देण्यास शिवसेनेचा स्पष्ट नकार आहे. किंबहुना उत्तर मध्य मुंबई व उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढविणार आहे की नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतील दक्षिण-मध्यवरचा दावा सोडून काँग्रेसला मुंबईतील दोन जागांवरच समानधान मानावे लागणार आहे.