सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
हिंगोली - 'पोलिस काका, माझे मम्मी-पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेर गावी जाणार आहेत. त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला न्या. पण, पुन्हा सोडून द्या', अशी विनंती करणारे पत्र ताकतोडा (ता. सेनगाव) येथील चिमुकला साईराम कैलास सावके याने गोरेगाव पोलिसांना शनिवारी (ता. ३०) दिले.
लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पालकांनी मताचा हक्क बजावावा, यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळ घातली जात आहे. त्यातूनच जिल्हा परिषद शाळा ताकतोडा येथील इयत्ता तिसरीतील साईराम याने घरी आई, वडिलांमध्ये होणारा संवाद पोलिसांना लिहिलेल्या पत्राद्वारे मांडला.
मतदानाच्या दिवशी आई-वडिलांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून सक्तीने मतदान करून घेण्याची विनंती साईरामने पत्रातून केली आहे. शिवाय त्यांनी मत दिल्यानंतर त्यांना सोडून द्यावे, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे.
काय आहे पत्रात ?
'चांगल्या माणसांना मतदान केले तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील व चांगली कामे करतील. आमचे शिक्षक म्हणतात, आपल्याकडे १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मात्र, माझे मम्मी-पप्पा बाहेरगावी जाणार असल्याने त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी. मतदानानंतर त्यांना सोडून द्यावे', असा मायना असलेले पत्र साईरामने पोलिसांनी दिले. गोरेगाव पोलिसांनी त्याचे कौतुक करून या पत्राची पोलिस दप्तरी नोंद करून घेतली.