Sangli Samachar

The Janshakti News

विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी प्रचाराचे नेतृत्व करावे, चंद्रहार पाटील यांचे आवाहनसांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
सांगली - झालं, गेलं गंगेला मिळालं, आता माझ्या प्रचाराचे नेतृत्व काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी करावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. चंद्रहार पाटील म्हणाले, उमेदवारीसाठी आग्रह धरणे कार्यकर्ता म्हणून ठीकच आहे. त्यांच्याबाबत माझ्या मनात कधीच कटुता नव्हती. जर महाविकास आघाडीने काँग्रेसला उमेदवारी दिली असती, तर मी खुल्या मनाने त्यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला असता. तशी कबुलीच मी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दिली होती. महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळाली असल्याने आता विशाल पाटील व विश्वजीत कदम यांनी खुल्या मनाने माझ्या प्रचारात सहभागी व्हावे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करेन.


अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार येणार

उद्धवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)चे नेते शरद पवार व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निश्चित करण्यात येईल. दि. १५ किंवा १९ एप्रिलला अर्ज दाखल करणार आहे, असेही चंद्रहार पाटील म्हणाले.