Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसचा माइंडगेम! सांगलीसाठी ठाकरेंना नवा प्रस्ताव; पॉलिटिकल खेळीत कुणाचा पत्ता कट?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१९ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा  तिढा अजूनही सुटलेला नाही. या मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आणि यानंतर खऱ्या अर्थाने धुसफूस सुरू झाली. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु विशाल पाटील माघार घेतील असे वाटत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मी माघार घेईल परंतु या मतदारसंघात काँग्रेसने दुसरा उमेदवार द्यावा अशी अट त्यांनी ठेवली होती. आता ही अट काँग्रेस नेत्यांना पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक प्रस्ताव दिला आहे. सांगलीची जागा आम्हाला द्या आणि त्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा तुम्हाला घ्या असा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचे समजते.

ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती देखील काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना केली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबई मतदारसंघ ठाकरेंना सोडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे तसेच ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी देऊ, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. परंतु विशाल पाटील यांच्याकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय काका पाटील यांना होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य डॅमेज कंट्रोल टाळण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा ठाकरेंनी घ्यावी असा प्रस्ताव काँग्रेसने तयार केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मागील इतिहासात डोकावून पाहिले तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील काँग्रेसकडून रिंगणात होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा भाजपचे संजय काका पाटील यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरला. वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिले होते. गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीत तीन लाखांहून जास्त मते घेतली होती. त्यामुळे विशाल पाटील यांचा पराभव झाल्याचे सांगितले गेले.

सांगली मतदारसंघात शिवसेनेची फारशी ताकद नाही. परंतु काँग्रेसचे येथे बळकट संघटन आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा पहिल्या इतकी बळकट राहिलेली नाही. त्यामुळे ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.