सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
नागपूर : पान टपरीवर ऐटीत उभे राहून सिगारेटचा धूर सोडणाऱ्या तरुणींकडे पाहणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. यावरून त्याचा तरुणींशी वाद झाला. संतापलेल्या तरुणींनी मित्रांना बोलावून घेतले. वाद विकोपाला गेला आणि मित्रांनी चाकूने सपासप वार करत तरुणाचा खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी 2 तरुणींसह तिघांना अटक केली आहे. रंजित बाबुलाल राठोड (वय 28, रा. ज्ञानेश्वरनगर, मानेवाडा रोड) असे मृताचे नाव आहे. आकाश दिनेश राऊत (वय 25, रा. हसनबाग), जयश्री दीपक पंझाडे (वय 24) आणि सविता सायरे (वय 24 दोन्ही रा. वाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजित हा गल्लोगल्ली फिरून रेडीमेड कपड्यांची विक्री करत होता. तसेच तो एका किराणा दुकानातही कामाला होता. त्याला पत्नी आणि चार मुली आहेत. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास जयश्री आणि सविता कॅबने मानेवाडा रोडवरील बाकडे सभागृहासमोर उतरल्या. त्यावेळी रंजित जवळच असलेल्या लक्ष्मण कवाडे यांच्या पानटपरीवर सिगारेट पित उभा होता. त्या तरुणींनीही पानठेल्यावर येऊन सिगारेट घेतली आणि ऐठीत धूर सोडत उभ्या झाल्या.
रणजितला हा प्रकार नवखा वाटला. तो आश्चर्याने त्यांच्याकडे पाहात होता. त्याने नजरच त्यांच्यावर रोखली होती. त्याच्या अशा पाहण्यामुळे दोघींनीही त्याला फटकारले. यावरून तरुणींसोबत त्याचा वाद झाला. जयश्रीने तिचा मित्र सुदेश राऊतचा भाऊ आकाश याला फोन केला. काही वेळातच आकाश मोटारसायकलने तेथे आला. तोपर्यंत रंजित महालक्ष्मीनगरात पोहोचला होता. आकाशने रंजितला अडवून जाब विचारला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. या दरम्यान आकाशने चाकू काढून रंजितच्या छाती, पोट आणि गळ्यावर वार करीत रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. त्यानंतर तिघेही मोटारसायकलने तेथून फरार झाले.
या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली. रंजितच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली आणि रंजितला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली. त्यावरून आकाश आणि दोन्ही तरुणींचा सुगावा लागला. रविवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेने रंजितच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.