Sangli Samachar

The Janshakti News

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर दगडफेक व धमकीचे पत्र; मनोज रंगे म्हणतात हा ओबीसी मते मिळवण्याचा प्रकार



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार घालण्यात आला. तसेच गाडीवर शाई सुद्धा फेकण्यात आली. गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकण्यात आली. पुढे चप्पलचा हार घालण्यात आला. प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत.

हॉटेल समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला. गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देण्यात आला होता. प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू घे वेड्या. धनगर आणि मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढीलवेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा असे पत्रक काचेवर चिकटवलं आहे.


याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसीतून आरक्षण देऊ नका असे आमचे कालही म्हणणे होते, आजही आहे आणि उद्याही तेच राहणार आहे. परंतु लोकशाहीत दडपशाहीचा प्रकार सुरू असून आम्ही अशा प्रकाराला भिक घालत नाही.

दरम्यान, शनिवारी रात्री सांगलीत ही घटना घडली. या घटनेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. शेंडगे यांना केलेली शिवीगाळ ही मराठा तरुणांनी केली सिद्ध होत असून हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला स्टंट असू शकतो, असे ते म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.