Sangli Samachar

The Janshakti News

सावरकरांच्या काळ्या पाण्यावर गलिच्छ बोलणाऱ्यांना केजरीवालांच्या तुरुंगवासाचे "कौतुक"!!सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गलिच्छ बोलणाऱ्या आणि अनर्गल प्रलाप करणाऱ्यांना अरविंद केजरीवालांच्या तुरुंगवासाचे मात्र कौतुकाचे भरते आले आहे. ते तुरुंगातल्या कोठडीत फरशीवर कसे झोपले ?, त्यांनी काय खाल्ले ?, त्यांनी प्राणायाम कसा केला ?, त्यांनी काय वाचले ?, वगैरे बहारदार वर्णने सध्या माध्यमांमधून सुरू आहेत. केजरीवालांच्या तुरुंगवासातल्या दैनंदिनीची वर्णने करणारे व्हिडिओ प्रसार माध्यमांनी व्हायरल केले आहेत आणि प्रिंट मीडियाने कॉलमच्या कॉलम मजकूर छापला आहे. केजरीवालांच्या तुरुंगवासाविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात कळवळा निर्माण करण्याचाच हा प्रपोगंडा आहे. 

अरविंद केजरीवालांना दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ईडी कोठडी ठेवले होते, पण त्यानंतर राऊज अव्हेन्यू कोर्टाने त्यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ते दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना "हाय प्रोफाईल" अशा बरॅक नंबर 2 मध्ये ठेवले. या बरॅक नंबर 2 मध्येच छोटा राजन आणि मोहम्मद शहाबुद्दीन हे "हाय प्रोफाईल" कैदी पूर्वी ठेवले होते. त्यानंतर केजरीवालांनाच बरॅक नंबर 2 चा "मान" मिळाला.


पण अरविंद केजरीवाल जणू काही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान करून तुरुंगात गेल्याचा आव "इंडिया" आघाडीतल्या नेत्यांनी आणि माध्यमांनी आणला. त्यांच्या तुरुंगवासाविषयी कळवळा आणणारे नक्राश्रू ढाळले. हे तेच "इंडिया" आघाडीचे नेते आहेत, की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आणि त्यांच्या कथित माफीनाम्यावर दुगाण्या झोडत असतात. पण माध्यमांनी देखील "इंडिया" आघाडीच्या नेत्यांच्या नादी लागून केजरीवालांच्या तुरुंगवासाची बहारदार वर्णने करणारे व्हिडिओ व्हायरल करून प्रिंट मीडियात कॉलम भरभरून मजकूर छापले.

अरविंद केजरीवाल काल रात्री बरॅक नंबर 2 मध्ये 14×8 च्या कोठडीत फेऱ्या मारताना आढळले. ते नंतर फरशीवरच झोपले. त्यांनी सकाळीच 7.00 वाजता नियमित प्राणायाम केला. "हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड" नावाचे ज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांचे पुस्तक त्यांनी मागून घेऊन वाचले. केजरीवाल सतत विचारमग्न दिसले. त्यांची शुगर लेव्हल घटल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना लगेच औषधे दिली गेली. रात्री त्यांना घरचे शिजवलेले अन्न वाढण्यात आले. केजरीवालांनी आपल्याला भेटू शकणाऱ्यांची 6 जणांची यादी तुरुंग प्रशासनाला दिली. त्यामध्ये पत्नी, मुलगा - मुलगी, वैयक्तिक सचिव विभव कुमार आणि आम आदमी पार्टीचे संघटन सचिव संदीप पाठक यांचा समावेश असल्याचे सांगितले. हे सगळे वर्णन माध्यमांनी केजरीवाल हे जणू काही फार मोठे स्वातंत्र्यसैनिक आहेत आणि ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले, अशा अविर्भावात केले आहे.

वास्तविक अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्यात मनी लॉन्ड्रीग केल्याबद्दल न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. हा दारू घोटाळ्यातलाच पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे पुरावे सापडले आहेत. हा पैसा तिथे कोणी वापरला त्यांची नावेच केजरीवालांनी ईडीच्या चौकशी आणि तपासात घेतली आहेत. दिल्लीचेच मंत्री आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज ही त्यांची नावे आहेत.

शिवाय भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले ते एकमेव मुख्यमंत्री नाहीत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील सध्या तुरुंगात आहेत. पण केजरीवाल हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयए हिच्यासाठी देशाची गुप्तहेरगिरी करत होते, असा दाट संशय तपासांती तयार झाला आहे आणि ही भ्रष्टाचारापलीकडची देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित अशी अतिशय गंभीर बाब आहे. तरी देखील इंडिया आघाडीच्या नेत्यांना केजरीवालांच्या तुरुंगवासाच्या कौतुकाचे भरते आले आहे आणि माध्यमांनी देखील त्यांच्या मागे फरफटून केजरीवालांच्या तुरुंगवासाची बहारदार वर्णने चालविली आहेत.