Sangli Samachar

The Janshakti News

मुंबईत उभा रहाणार तिन्ही सेना दलांचा एकत्रित पहिला 'त्रिदल तळ' !



सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
मुंबई  - तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला 'त्रिदल तळ' हा मुंबईत उभा रहाणार आहे. तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने सिद्ध केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास चालू आहे. 'देशाच्या तिन्ही दलांनी संयुक्त मोहिमा कराव्यात, या मोहिमा करतांना तिन्ही दलांनी एकमेकांच्या सामग्रींचा उपयोग करावा', असे भारताचे संरक्षण आणि सामरिक धोरण आहे. एकमेकांकडे असलेल्या स्रोतांचा सक्षम वापर करणे, हे या तळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 
तिन्ही दले एकमेकांच्या सामग्रीचा उपयोग मोहिमांसाठी करतील. मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय असल्याने अर्थातच येथील हा तळ नौदलाच्या अखत्यारित असेल.

मोहिमेची सज्जता आणि देशाची सामरिक सुरक्षा यांसाठी आगामी काळात ५ 'थिएटर कमांड' देशभरात उभे रहाणार आहेत. त्याची पूर्वसिद्धता म्हणून हा तळ उभा रहात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंदमान आणि निकोबार येथे तिन्ही दलांचा संयुक्त कमांड अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचाच हा पुढचा टप्पा आहे.


हवाईदलाच्या तळावर कोइम्बतूर येथे आणि भूदलाच्या तळावर गुवाहाटी येथेही असे तळ भविष्यात उभे रहातील. नुकताच नौदलाकडून व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी सध्या अरबी समुद्रात चालू असलेल्या 'ऑपरेशन संकल्प' या मोहिमेत कमांडोंना पाण्यावर उतरवण्यासाठी हवाई दलाच्या विमानाचा वापर झाला होता.