Sangli Samachar

The Janshakti News

प्रवासी-मालवाहतूक रिक्षा धडकेत मामी-भाचा ठार



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२६ एप्रिल २०२४
बुधगाव ते बिसूर ऱस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे अश्विनी शीतल पाटील (वय ३२, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ) आणि राघव रमेश पाटील (वय १ वर्षे) ठार झाले. मृत दोघे मामी आणि भाचा आहेत. बुधवारी, दि. २४ रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा. बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगावचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. बुधवारी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार याच्या रिक्षा (एमएच १० के ४९५२) मधून शेजारील ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील व चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते.


रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते. तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा (एमएच १० सीक्यू २७६८) येथे होती. परंतू या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हता. या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली. आतील पाच महिला व स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील ही मुले जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघेजण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधगाव-बिसूरवर शोककळा

मृत अश्विनी हिचा वर्षापूर्वी विवाह झाला होता. तर चिमुकल्या राघवच्या जावळाचा कार्यक्रम नुकतेच झाला होता. बुधगावला सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कुटुंबिय एकत्र आले होते. अपघातामध्ये मामी आणि चिमुकल्या भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे.

रिक्षात चालकासह ११ जण

ज्या प्रवासी रिक्षाचा अपघात झाला, त्यामध्ये पाच महिला आणि पाच मुले असे चालकासह ११ जण बसले होते. अपघातानंतर काही बाहेर फेकले गेले तर काही आत अडकले. अपघातानंतर अंधारात गोंधळ उडाला होता.