| सांगली समाचार वृत्त |
होशंगाबाद - दि.१५ एप्रिल २०२४
आण्विक निःशस्त्रीकरणाच्या बाजूने इंडिया आघाडीचा एक गट असून, अशा विचाराचे लोक देशाचे संरक्षण करू शकत नाहीत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. राहुल गांधी यांनी अलिकडेच एकाच झटक्यात गरिबी हटवण्याबाबत वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील पिपरिया येथील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांना टोमणा मारला आणि त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. मात्र, भाजपा सरकारने त्यांचा सन्मान केला.
इंडिया आघाडीतील एक घटकाने जाहीरनाम्यात आण्विक निःशस्त्रीकरणाची घोषणा केली, असे मोदी यांनी माकपवर टीका करताना सांगितले. ज्यावेळी शत्रूंकडे आण्विक ताकद असते, तेव्हा देशाला अण्वस्त्रांची गरज आहे की नाही, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेक धोकादायक आश्वासने देण्यात आली आहेत. त्याच्या एका घटकपक्षाच्या जाहीरनाम्यात म्हटले की, देशाला अण्वस्त्रमुक्त केले जाईल, असे मोदी म्हणाले. देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे अण्वस्त्रे असली पाहिजेत, हे लोक देशाचे संरक्षण कसे करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोक हसतील अशी घोषणा काँग्रेसच्या राजकुमाराने केली. देश राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही, असे मोदी यांनी सांगितले.