| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.२५ एप्रिल २०२४
काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे आहे. जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतेच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलेले माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान सांयकाळी काल जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. यावेळी तिघा अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी विलासराव जगतापांकडून जत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हल्लेखोर भाजपाचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विलासराव जगताप यांनी भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. यावरुनच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.