| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२२ एप्रिल २०२४
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरचा पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर दरी पुलाचेही काम वेगाने सुरू आहे. या मिसिंग लिंकचे काम येत्या तीन ते चार महिन्यांत पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने ठेवले आहे. त्यानुसार मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
मुंबई व पुणे या दोन्ही शहरांमधील अंतर कमी करून प्रवासाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबईला प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पातील बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे, तर पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा असून, या दोन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. पुढील तीन- चार महिन्यांत मिसिंग लिंकचे काम पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यामुळे घेतला प्रकल्प हाती
मुंबई- पुणे द्रुतगती व मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.
त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले.