Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे विधानसभेलाही उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता



सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
मुंबई  - भाजपच्या दबावामुळे तीन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत याचेच पडसाद उमटून उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे. पक्षाच्या आमदारांमध्ये अशीच चलबिचल सुरू राहिल्यास शिंदे यांच्यासाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते. शिंदे यांनी भाजपच्या दबावाला बळी पडू नये, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडून मांडली जात आहे.

भाजपच्या दबावामुळे हिंगोलीत खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली. खासदार पाटील यांची उमेदवारी दोन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. पण पाटील उमेदवार असल्यास निवडून येणार नाहीत, असे भाजप नेत्यांनी सर्वेक्षणाच्या आकडेवारीच्या आधारे लक्षात आणून दिल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांची उमेदवारी रद्द केली. रामटेकमध्येही भाजपच्या दबावामुळे काँग्रेसच्या आमदाराला उमेदवारी देण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली. यवतमाळ-वाशीमध्ये भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली.

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदारांनी शिंदे यांना साथ दिली होती. यापैकी तीन विद्यमान खासदारांना शिंदे यांनी उमेदवारी नाकारली आहे. लोकसभेसाठी मोठे मतदारसंघ असताना भाजपच्या दबावापुढे शिंदे झुकले. यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय होईल, अशी भीती आमदारांना सतावू लागली आहे. लोकसभेत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा खरोखरीच मिळाल्यास भाजपला मित्र पक्षांची गरज भासणार नाही. तशा परिस्थितीत भाजप शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर दावा करू शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे.


भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार बदलण्यात येत असल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर अवलंबून राहून निर्णय घेत राहिलो तर कार्यकर्त्यांची गरजच काय हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांंनी केलेला सवाल बोलका आहे. पक्षप्रमुख कोणत्याही निर्णयावर ठाम राहणे हे शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे. पण मित्र पक्षाच्या दबावाला झुकून निर्णय घेऊ लागले तर पक्षात कोणीच त्यांच्याबरोबर राहणार नाही, अशी प्रतिक्रिया एका आमदाराने व्यक्त केली. मुंबईतील एका आमदाराने भाजपच्या दबावामुळे आपल्याला उमेदवारी नाकारल्यास सरळ अपक्ष लढण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने काही विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांचे योग्य ते राजकीय पुनर्वसन करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत. शिवसेनेत शिंदे यांना साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. आदित्य ठाकरे नाहक संशय निर्माण करीत आहेत . पक्षाच्या आमदारांचा शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. 
– भरत गोगावले, आमदार शिंदे गट