Sangli Samachar

The Janshakti News

विशाल दादांना लोकसभेची लढाई एकाकी लढावी लागणार !



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
वसंतदादा घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विशालदादा पाटील यांच्या रूपाने वसंतदादा घराण्याचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अखेरपर्यंत सांगली लोकसभेची उमेदवारी विशालदादांना मिळावी, यासाठी जिल्हा काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली प्रतिष्ठा पणाला लावली. पण शेवटी येथे ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील यांनी मैदान मारले.

हे का घडले ? यामागे कोण ? यापेक्षा आता लढण्यासाठी सोबत कोण ? हे खूप मोठे प्रश्नचिन्ह विशालदादा पाटील यांच्यासमोर उभे आहे. डॉ. विश्वजीत कदम असोत अथवा पृथ्वीराज पाटील, विशाल दादांसाठी ही मंडळी आपले पद पणाला लावतील का ? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. विशाल दादा काँग्रेसतर्फे रणांगणात असते, तर या साऱ्यांची एकसंघ ताकत पाठीशी उभी राहिली असती. परंतु आता विशाल दादांना काँग्रेस श्रेष्ठींच्या भूमिकेमुळे अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. अशावेळी पदावरील ही मंडळी उघडपणे विशाल दादांच्या पाठीमागे उभी राहतील, ही शक्यता धुसर होताना दिसत आहे. आणि म्हणूनच नेते महाआघाडीच्या स्टेजवर, कार्यकर्ते विशाल दादांच्या पाठीशी हे चित्र दिसणार का ? हा दुसरा प्रश्न !


काल मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करून, येथील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. आता हे लोण जिल्ह्यातील इतर तालुक्यात पसरणार का ? पक्ष कारवाईचा बडगा कोण अंगावर घेणार ? हे पुढील आठवड्याभरात दिसून येईल. अशा वेळेला विशालदादा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाजू समजून घेतीलही, पण त्यातून दुहीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांवर याचा काय परिणाम होतो, हेही पहावे लागेल.

"दादांच्या नातवावर झालेला अन्याय !" हा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार असला तरी, याची धग ७ मे पर्यंत कायम ठेवावी लागणार आहे. यासाठी विशाल दादांच्या बरोबर कोण असणार आणि ही मंडळी ही धग कायम ठेवण्यासाठी, यशस्वी ठरणार का ? असा प्रश्न उपस्थित होतो. सांगली लोकसभेच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, विशाल दादांचे सेनापती व कार्यकर्त्यांना मोठी रसद पुरवावी लागणार आहे. ही रसद पुरवण्यासाठी विशाल दादांना 'हात' सैल सोडावा लागणार आहे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

विशाल दादांना प्रचारासाठी अवघ्या पंधरा दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीत ते अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचतात, यावरही बरेचसे अवलंबून आहे. भाजपचे संजय काका यांनी प्रचारात घेतलेली आघाडी, विशाल दादांना 'कव्हर' करावी लागणार आहे. यासाठी त्यांच्याविरुद्धच्या नाराज गटाला बरोबर घेण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुरुवातीच्या काळात सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसवर, विशेषतः विशाल दादांवर केलेल्या कुरघोडीमुळे बराचसा कालावधी वाया गेलेला आहे. आता उर्वरित कालावधीत आपली बाजू भक्कम करून विशाल दादा विजयश्री खेचून आणण्यासाठी काय आणि कसे लढतात ? त्यांना कोण कोण मदत करणार ? कोण पायात पाय घालणार ? यासाठी पुढील पंधरा दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.

एकंदरीत वसंतदादा घराणे, विशाल दादांवर झालेला अन्याय, त्यांची बंडखोरी आणि त्या पाठीमागे उभी राहणारी कार्यकर्त्यांची फौज हाच विषय चर्चेत राहणार आहे, हे मात्र नक्की.