Sangli Samachar

The Janshakti News

अवयव प्रत्यारोपणास प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनसांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
पुणे - पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने सोसायटी ऑफ क्लिनिकल अ‍ॅनाटोमिस्ट्सची 12 वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेची सुरुवात गुरुवारी (दि. 4) 'अवयव प्रत्यारोपणाचे शारीरिक पैलू' या विषयावरील कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) या पूर्वपरिषदेने झाली. ही परिषद 6 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या वर्षीच्या परिषदेची मुख्य संकल्पना 'डिसेक्शन हॉल ते ऑपरेशन थिएटरपर्यंत शरीरशास्त्राचा प्रवास,'ही आहे. क्लिनिकल अ‍ॅनाटॉमीचे पुस्तकी शिक्षण ते प्रत्यक्ष शस्त्रक्रियेतील उपयोगापर्यंतच्या प्रवास दर्शवण्याचा उद्दिष्ट यामागे आहे.

या परिषदेत विविध वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यावसायिक अवयव प्रत्यारोपणाचे शारीरिक आणि शल्यचिकीत्सक पैलू, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, शरीरशास्त्रातील थ्रीडी प्रिंटिंग, ब्रेन इमेजिंग यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करतील. या परिषदेला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराजदादा पाटील, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे डीन डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या शैक्षणिक विभागाच्या संचालक डॉ. पी. वत्सलस्वामी उपस्थित होते.


डॉ. यशराजदादा पाटील म्हणाले, की ही परिषद बुद्धिमत्ता आणि नावीन्यपूर्ण विचारांना एकत्र आणणार आहे. आरोग्यसेवा शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचा हा एक उल्लेखनीय पुरावा आहे. वैद्यकीय संशोधन, शस्त्रक्रियेतील नावीन्यपूर्ण पद्धती, शैक्षणिक पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, ज्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्राचे भवितव्य आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रगती याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे.