Sangli Samachar

The Janshakti News

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य -



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ३० एप्रिल २०२४
सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. 


दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल 250 महिला व 100 पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 3500 किलो गुलछडी, 800 किलो झेंडू, 120 किलो कन्हेर फुले, 1 लाख गुलाब, 70 हजार चाफा, 100 कमळे, 1 लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.