Sangli Samachar

The Janshakti News

राबराब राबले पण घरी परतलेच नाहीत; सांगलीत भीषण अपघात; 4 ऊसतोड मजूरांचा मृत्यू



सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
सांगली - सांगलीतून भीषण अपघात झाला असून या घटनेत ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. ऊसतोड मजुरांला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सांगली सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. मंगळवेढा तालुका चिकलगी भुयार येथील ऊसतोड मजूर परत जात असताना हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली.


या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.

मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा. शिरनांदगी) , जगमा तम्मा हेगडे (वय 35) दादा आप्पा ऐवळे (वय 17) निलाबाई परशुराम ऐवळे रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.