Sangli Samachar

The Janshakti News

कोल्हापूरला जाणाऱ्या बिहारच्या 32 अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि.२६ एप्रिल २०२४
बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या ३२ मुलांना मिरजेत ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. मिरजेतील चाइल्ड लाइन संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. अधिक माहिती अशी, धनबाद ते कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तपासणीच्या दरम्यान एका डब्यात ३२ मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत पालक नसल्याचे समजले. चौकशीत ही मुले कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत जाणार असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली. त्यांनी चाइल्ड लाइनच्या मदतीने स्थानकावर धाव घेतली.


चौकशीत अल्पवयीन मुलांचे पालक सोबत नसल्याचे दिसून आले. बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार त्यांना ताब्यात घेतले. बिहार राज्यातील बालकल्याण विभागाशीही संपर्क केला आहे. जिल्हा बालकल्याण समिती सदस्य निवेदिता ढाकणे, कालिदास पाटील, आयेशा दानवडे, दीपाली खैरमोडे, बालविकास अधिकारी संदीप यादव, संरक्षण कक्षाचे रोहिणी वाघमारे, रोहित पाटील, अश्विनी माळी, चाइल्ड लाइनचे अश्विनी कुंभार, नीलेश पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.