Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्देसांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
मुंबई -  भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरून काय राजगर्जना करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत असतानाच आपण भाजपला कोणत्याही अटीशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. अर्थात या 'अटीशिवाय' घोषणे मागे आगामी विधानसभेचे गणित असल्याचे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. राज ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणातील हे 10 मुद्दे.

1. मी आताच सांगतोय डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये. ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी तुम्ही आयुष्य घालवताय त्या हॉस्पिटलमध्ये परत जा काम करा तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतं मी बघतो. असा थेट आव्हान त्यांनी दिला आहे.

2. अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन.

3. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही. काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... "अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही." तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका.

4. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार... ! कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.

5. मी अमित शहांना भेटल्यानंतर... २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, २०१९ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.

6. आज उद्धव ठाकरे, संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. उद्धव ठाकरे , संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात यायचं होतं.

7. माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या. तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल.

8. २०२४ ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.

9. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.

10. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा.

null