Sangli Samachar

The Janshakti News

चुकीच्या UPI खात्यात पैसे गेल्यावर ते परत कसे मिळवायचे?



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
मुंबई  - अनेक लोकांकडून घाईघाईत चुकीने दुसऱ्याच व्यक्तीच्या युपीआय आयडीवर क्लिक करून पैसे पाठवले जातात. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दुसऱ्या व्यक्तीच्या युपीआय आयडीला कनेक्टेड असल्यास अशा वेळी या अडचणींचा सामना करावा लागतो. चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे पाठवले गेल्यास ते त्याच्याकडून परत कसे मिळवायचे याची चिंता सर्वांनाच वाटत असते. आपण पुढील लेखात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहेत.

चुकीच्या खात्यावरून परत पैसे कसे मिळवायचे? -

दुसऱ्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवल्यास ते चुकून गेले आहेत याचा आपल्याकडे पुरावा असायला हवा, तो पुरावा बँकेला सिद्ध करून दाखवावा लागतो.
एकदा व्यवहार युपीआय खात्यावर झाला आहे, हे पटल्यास बँकेकडून पुढील कारवाई केली जाते.
रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना बनवण्यात आली आहे. या योजनेच्या नियम 8 नुसार बँकेकडून ग्राहकाला पैसे न मिळाल्यास ग्राहकाला बँकेच्या लोकपालकडे दाद मागता येते.
लवकर तक्रार केल्यास पैसे मिळू शकतात -
ग्राहकाने चुकीच्या युपीआय आयडीवर पैसे पाठवल्यास लवकर तक्रार दाखल करायला हवी. त्यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.
व्यवहाराचे तपशील आणि संबंधित खाते क्रमांकाची माहिती बँकेशी संपर्क साधून तक्रादाराने द्यायला हवी.
चुकून पाठवलेल्या युपीआय आयडीधारकाला संपर्क करून पैसे परत मागण्याची विनंती करावी. बँक ग्राहकाला पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते.
बँकेत जाऊन माहिती देणे आणि युपीआय आयडीधारकाशी संपर्कात राहणे, या दोन पर्यायांमुळे पैसे मिळू शकतात.
नक्की वाचा : UPI : युपीआय म्हणजे काय?


चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास NPCI वर तक्रार कशी दाखल करावी ? -

युपीआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीकडून चुकीचा व्यवहार झाल्यास तक्रार नोंदवता येते. फसवणूक झालेली व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी NPCI च्या विवाद निवारण यंत्रणेचा वापर करू शकते.

आपण तक्रार कशी नोंदवता येईल याबाबतची माहिती समजून घेऊयात.

फसवणूक झालेल्या तक्रारदाराने https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism या वेबसाईटला सर्वात आधी भेट द्यावी. येथे गेल्यानंतर 'complaint' या पर्यायावर क्लिक करा. तेथे जाऊन ड्रॉप डाऊन मेनूतून व्यवहाराचा प्रकार निवडा.
समजा, तक्रारदाराने एखाद्या चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास व्यवहाराचे स्वरूप 'व्यक्ती ते व्यक्ती' आणि समस्यामध्ये जाऊन 'अन्य खात्यात चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित' हा पर्याय निवडावा. NPCI च्या वेबसाईटचा समस्या सोडवण्यासाठी वापर करता येतो. एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास बँक लोकपालाशी संपर्क साधता येतो.
नक्की वाचा : UPI Transactions: युपीआयच्या लोकप्रियतेचे परिणाम

एखाद्या व्यक्तीकडे ग्राहकाचा मोबाईल नंबर असल्यास बँक खात्याचा वापर करता येतो का? -

ग्राहकाने बँकेत खाते उघडल्यास बँकेकडून बहुस्तरीय सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर केला जातो. बँकेमध्ये खाते असल्यास ग्राहकांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जाते. एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर बदलून दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यास फक्त अधिकृतच व्यक्ती बँक खात्याची माहिती घेऊ शकते. त्यामुळे अशावेळी मूळ खातेदाराने काळजी करायची गरज नसते.
बँकेशी ग्राहकाचा मोबाईल नंबर जोडलेला असतो, त्याद्वारे बँक खात्यातून केलेल्या व्यवहाराची माहिती मिळते.

निष्कर्ष :

युपीआय खात्याच्या माध्यमातून व्यवहार करताना काळजी घ्यावी. चुकून एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधावा.
बँकेशी संपर्क साधूनही तक्रारीचा मार्ग न निघाल्यास NPCI च्या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करावी. त्यासोबतच बँकेच्या लोकपाल विभागाशी संपर्क साधून तक्रारीचे निवारण करता येते.