Sangli Samachar

The Janshakti News

Flipkart आणि Amazonने बदलली 'रिप्लेसमेंट पॉलिसी', ग्राहकांना होतोय मनस्तापसांगली समाचार - दि. १ मार्च २०२४

मुंबई : तुम्ही अ‍ॅमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्टसह (Flipkart) देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून वस्तू खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. या पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू खराब झाली असेल, तर तुम्ही ती ताबडतोब बदलू शकणार नाही, म्हणजे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून एखादी वस्तू विकत घेणे आणि ती बदलणे ही एक वेळकाढूपणा ठरणार आहे. नक्की काय बदलले आहे? जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने केले मोठे बदल

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोनही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये बदल केला आहे. या कंपन्यांनी 7 दिवसांत वस्तूंची देवाणघेवाण करण्याची योजना बंद केली आहे. याआधी या कंपन्यांकडून खराब झालेल्या किंवा सदोष वस्तू बदलून दिल्या जात होत्या. पण त्याऐवजी आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ग्राहकांना संबंधित प्रोडक्टच्या सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एखाद प्रोडक्ट तुम्ही विकत घेतलं आणि त्यात काही दोष आढळला तर तुम्हाला सेवा केंद्रात चकरा माराव्या लागणार आहेत. आणि आपण घेतलेल्या वस्तूचे सर्विस सेंटर आपल्या शहरात नसेल तर 'गई भैस पाणी में' अर्थात आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक म्हणून फ्लिपकार्ट असो किंवा ॲमेझॉन यावरून वस्तू खरेदी करण्यापूर्वी या वस्तूचे सर्विस सेंटर आपल्या शहरात आहे का याची खात्री करून घेऊन मगच ऑर्डर द्या.


वस्तूंची देवाणघेणार करता येणार नाही

ग्राहकांना यापुढे घरात बसून वस्तू आणि वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळणार नाही. अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्टने हा नियम बदलल्याने ग्राहक सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. उत्पादन कमी दर्जाचे निघाले तर ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण सदोष वस्तू सात दिवसात बदलून देण्याचं धोरण बदललं असून या दोन्ही कपन्यांनी सात दिवसात सर्व्हिस सेंटरमध्ये वस्तू बदलण्याचा पर्याय दिला आहे. म्हणजे या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7 Days Replacement मध्ये बदल करत 7 Days Service Centre Replacement असा बदल केला आहे.

जर तुम्ही Amazon, Flipkart वरून डिजिटल वस्तू, उत्पादने, स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, इअरबड्स खरेदी करत असाल तर त्या प्रोडक्टशी संबंधीत जवळच्या सर्व्हिस सेंटरचीही माहिती घेऊन ठेवा. उत्पादन सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यास, तुम्ही ताबडतोब सेवा केंद्रात (Service Centre) जाऊन त्याबद्दल तक्रार करू शकता आणि उत्पादन कधी मिळेल याची माहिती मिळवू शकता. मात्र या धोरणामुळे ग्राहकांचा वेळ तर जाणारच आहे, शिवाय नाहक मनस्तापही सहन करावा लागणार आहे.