Sangli Samachar

The Janshakti News

कृष्णा कॅनलमध्ये पाणी न सोडल्यामुळे पाणी टंचाईसांगली समाचार  - दि. १७ मार्च २०२४
सांगली - यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात नद्याच्या पाणी पातळीत घट होताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची भयावह अवस्था पहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने फेब्रुवारीपासूनच टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, पलूस या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील पलूस शहरासह तालुक्यातील काही गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे. कृष्णा कालवा व आरफळ कालव्यात पाणी सोडले जात नसल्याने स्थानिकांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

कृष्णा नदीत कोयना धरणातून पाणी न सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, नदीमध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठी संबंधित -अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे विनवणी करण्याची वेळ आली आहे. पलूस तालुक्यात तुपारीपासून वसगडेपर्यंतच्या शेतीला वरदान ठरलेल्या कृष्णा कालव्यातही पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.


पलूस तालुक्यातील द्राक्षबागा, ऊस, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी, पाटबंधारे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदने दिली, चर्चा केली, आंदोलने केली, तरीही कालव्यात पाणी सोडले जात नाही, हे दुर्दैव.

तीच स्थिती आरफळ योजनेच्या बाबतीत आहे. मात्र, आरफळ योजनेतून काही महिन्यांत पाणी आले नसल्याने सांडगेवाडी, आंधळी, मोराळे, बांबवडे, पलूस, कुंडल येथे टंचाई निर्माण झाली आहे.  या वर्षीं पाऊस कमी झाल्याने व आरफळ योजना, कृष्णा कालव्यात पाणी नसल्याने विहिरी, तलाव, कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. काही ठिकाणी विहीर, तलाव कोरडे पडलेत. पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाला अद्याप तीन ते चार महिने अवकाश आहे. तोवर उन्हाळ्याची झळ बसणार आहे. तेव्हा पाण्याची टंचाई अधिकच भासणार आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी निदाना आरफळ व कृष्णा कालव्यात पाणी सोडून शेतीला जीवदान देण्याचे कामा करावे, अशी मागणी आहे. या वर्षी पाऊस कमी झाला, आरफळ व कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नाही. शासन शेतकरी व जनतेची परीक्षा पाहत आहे. त्यामुळे शेती; पर्यायाने शेतकरी धोक्यात, अडचणीत सापडला आहे.