Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवार बोलले अमोल कोल्हेंवर. टोले बसले भाजपला!
सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
मांडणगाव  - 'नट-नटय़ांचे, सेलिब्रिटींचे राजकारणात काय काम?' अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर केली; मात्र हे टोले त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच बसले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवार यादीत किमान चार अभिनेता, अभिनेत्रींना तिकीट दिले आहे.

मांडणगाव फराटा येथील शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी पुन्हा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना टार्गेट केले. 'अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीला उभे राहतात; पण त्यांचा राजकारणाशी काय संबंध? या नट-नटय़ांचे राजकारणात काय काम? राजकारणात सेलिब्रिटी आला की सुरुवातीला बरं वाटतं. दिसायला चांगला, मिश्यांना पीळ दिलेला, राजबिंडा गडी पाहिला की, आपण ईव्हीएम मशीनचे बटण दाबून त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून आम्हीही चुका केल्या. त्यांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा चांगला निघेल; पण त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही, अशी टीका अजित पवार यांनी कोल्हेंवर केली.


– अजित पवारांनी टीका अमोल कोल्हेंवर केली खरी, पण त्याचे टोले भाजपला बसले. मग भाजपच्या उमदेवारांचे काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेच पहिल्या यादीत ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, अभिनेते रवि किशन, मनोज तिवारी, गणेशलाल यादव 'निरहुआ' यांना उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपचे खासदार होते.

तुमच्या पक्षात येण्यासाठी मला 10-10 वेळा निरोप का देता?
अजित पवार यांच्या टीकेला शिरूरचे खासदार कोल्हे यांनी 'एक्स'द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणे चूक असेल तर 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचे कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचे कारण काय, असा थेट सवाल कोल्हे यांनी केला आहे. अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. त्यांनी ज्या कलाकारांची उदाहरणे दिली त्यातील एकही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. सेलिब्रिटी म्हणून मला हिणवता, मात्र माझी संसदेतील कामगिरी कायमच उजवी राहिली आहे. हवं तर रेकॉर्ड तपासून पाहा, असे कोल्हे यांनी सांगितले.