Sangli Samachar

The Janshakti News

नो मशाल, ओन्ली विशाल, सांगलीत काँग्रेस आक्रमक; ठाकरेंच्या उमेदवाराला थेट विरोधसांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
सांगली  - ठाकरे गटाकडून सांगलीमधून चंद्रहार पाटील  यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. तसेच, चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 'सांगलीत नो मशाल, ओन्ली विशाल' असा ट्विटर ट्रेंड  करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील  यांचे नातू विशाल पाटील  यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत सभा घेऊन चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जात होती. सांगलीचे आमदार विश्वजित कदम देखील सांगलीची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी प्रचंड आग्रही आहेत. पण, आज ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सांगलीमधील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.

'नो मशाल, ओन्ली विशाल'

सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचे पडसाद आता थेट सोशल मीडियात देखील पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांचे समर्थक यांनी थेट सोशल मीडियावर मोहीम राबवत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यासाठी 'नो मशाल, ओन्ली विशाल' अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली जात आहे.