सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावरून आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. तर सांगली आणि भिंवडीच्या जागेवरुन आघाडीतील मित्रपक्ष आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाने चर्चा न करता सांगलीतील आपला उमेदवार जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सांगलीची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे मविआमध्ये अद्यापही जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडीतील जागावाटपाच्या याच वादावर बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी, 'महाविकास आघाडी आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं वक्तव्यं केलं आहे.
सध्या राज्यातील विविध मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यावरुन राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, काही जागांसाठी मित्रपक्षांमध्ये वाद सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. मग सांगली भिवंडीवरुन आघाडीत तर नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. मात्र, युतीपेक्षा आघाडीमध्ये जास्त मतभेद असून जागा वाटपारून आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरु असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.
महाजन म्हणाले, "खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्याकडे आली आहे. पाच-सात लोकं शरद पवारांकडे तर पाच-सात आमदार हे उद्धव ठाकरेंकडे राहिलेले आहेत. ही जागा मला ती जागा मला यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरू आहेत, त्यांची रोज भांडणं होत आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं नाही, त्यामुळे या देशात आणि राज्यामध्ये अनुकूल परिस्थिती ही भाजपला आहे." महाजन यांच्या या वक्तव्यामुळे खरंच आघाडीत बिघाडी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.