Sangli Samachar

The Janshakti News

वसंतदादांच्या नातवासाठी काँग्रेस करणार बंड?सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
सांगली - ऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रातील उमेदवारांना तिकीटे वाटणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर आता काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत थांबण्याची वेळ आली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता पकडत असताना वसंतदादांच्या वारसांनी 'हात के साथ' असा नारा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी आता काँग्रेसनेही महाविकास आघाडीत बंड करण्याची तयारी केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. मात्र, काँग्रेसनेही येथे माघार न घेण्याचे धोरण स्वीकारले असून दिल्लीतील वरीष्ठांनीही त्यासाठी 'हिरवा कंदील' दिल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु होण्याआधीपर्यंत सांगली काँग्रेस लढणार, हे निश्‍चित होते. जनसंवाद यात्रेतून विशाल पाटील यांनी तयारी केली होती. पतंगराव कदम यांच्या कुटुंबाशी असलेला पारंपारिक वाद मागे सोडून त्यांनी आमदार विश्‍वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य केले होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी संघर्ष टाळण्याचे धोरण ठेवले होते. तरीही, विशाल पाटील यांची कोंडी करण्यात महाविकास आघाडीतील 'सुप्त शक्ती' यशस्वी झाल्याची भावना आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसला सोडला, मात्र त्या बदल्यात सांगलीची मागणी केली. ती मान्य न झाल्याने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांची उमेदवारीही जाहीर केली. उद्धव ठाकरे स्वतः मिरजेला आले होते. पहिल्या यादीत चंद्रहार यांच्या नावाचा समावेश केला. शिवसेनेच्या या एकतर्फी आक्रमणाला आता काँग्रेसने त्याच स्टाईलने उत्तर देण्याचे धोरण राबवले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशाल लढतील, अशी भूमिका घेतली आहे. त्याला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी.वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रमेश चेन्निथला यांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही 'ग्रीन सिग्नल' दिल्याचे समजते. सांगलीसोबतच भिवंडी आणि मुंबईतील काही जागांचा विषय ताणला गेला आहे. या जागांसाठी ठाकरे गटाला भिडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वांत मजबूत पक्ष आहे, मात्र ठाकरे गट आपला आग्रह रेटत असल्याने वाद टोकाला गेले आहेत.

काँग्रेसविरुद्ध भाजप लढत अटीतटीची...

सात दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या पैलवानाला दिलेला ठाकरेंचा शब्द महत्वाचा की ८० वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या नातवाला दिलेला काँग्रेसचा शब्द महत्वाचा, याचा फैसला करा, असे विशाल पाटील दिल्लीत सांगून आले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसविरुद्ध भाजप ही लढत अटीतटीची होईल, याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये विश्‍वास आहे.

काँग्रेसने 'हात' दिला नाही तर विशाल पाटील यांच्यासमोर बंडाचा पर्याय असेल, मात्र या बंडाचे नेतृत्व आमदार विश्‍वजित कदम करतील का आणि हे बंड काँग्रेसचे म्हटले जाईल का, हा मुद्दा महत्वाचा आहे. तसे झाले तरच विशाल बंड करतील अन्यथा शांत राहण्यावाचून त्यांना पर्याय नसेल. वसंतदादा घराण्याला राजकीय रिंगणातून बाहेर ठेवण्याचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल.