Sangli Samachar

The Janshakti News

संजय राऊतांकडून मोदींची औरंगजेबाशी तुलना, भाजपने घेतला मोठा निर्णय



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. आता मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली. यावरून सत्ताधारी पक्षाने संजय राऊत यांना चांगलेच धारेवर धरले आहे. 


आता मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी करून एका मोठ्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. तसेच संजय राऊत हे समाजात जातीय तेढ निर्माण करू पाहत असल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, अशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आता संजय राऊत यांच्याविरोधात काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत? 

संजय राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आहे, त्याच्या बाजूला दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे. दोघांची विचारसरणी सारखीच आहे, अशी तुलना त्यांनी केली होती. 

संजय राऊतांना मोदींचे प्रत्युत्तर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरकार आपल्या दहा वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवत आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत. ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच 104 व्यांदा मोदींना शिवी दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.