Sangli Samachar

The Janshakti News

मुलींचे फोटो गाठोड्यात बांधून स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार



सांगली समाचार  - दि.  २८ मार्च २०२४
वाळवा - स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार करण्याचा चिकुर्डे (ता.वाळवा) येथे बुधवारी उघडकीस आला. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणाऱ्या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी. आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ. सुदाम माने, विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली.

कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढले.आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली,लिंबु व मुलींचे रंगीत फोटोला टोकदार दाभनातून नारळात खुपसले होते. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचे नाव लिहले आहे. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली आहे.